खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:40 PM2019-05-05T21:40:48+5:302019-05-05T21:41:38+5:30
खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे याच प्रकल्पातील सोडलेल्या पाण्याची उचल करून वर्धा शहर व वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना पुरवठा केल्या जातो. शिवाय वर्धेकरांसाठी ‘धाम’ किती महत्त्वाचा आहे, याबाबचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खासदारांनी धामची पाहणी केली.
खा. तडस यांनी खरांगणा (मो.) परिसरातील धामनदीच्या पात्राची पाहणी केली असता पुलाच्या कामादरम्यान माती व मुरुम नदीपात्रामध्ये टाकल्या गेल्यामुळे नदीपात्रातील पाणी वर्धेच्या दिशेने जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच खरांगणा परिसरातील गावांमध्येही भीषण पाणी समस्या असल्याचे लक्षात आले. याकरिता उल्लेखनिय पुर्नजिवनाचे कार्य गरजेचे असल्याचे सांगितले. खा. तडस यांनी धाम प्रकल्पाचा मुख्य कालवा, पिपरी (मेघे) भागाची पाहणी केली. या कालव्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्राची पाहणी करण्यात आली. नदी पात्राला झुडपांचा विळखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने नदीपात्र अरुंद व उथळ झाल्याचे आढळले. तर नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जात सोडल्या जात असल्याने नदी प्रदुषित होत असल्याचे दिसून आले. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल वर्धा न.प., एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, मध्य रेल्वे, आंजी ग्रा.पं. प्रशासन तसेच नदी तिरावर असलेली गावे करतात. यामुळे येथे उगम ते संगम पुर्नजिवन कार्य गरजेचे असल्याचे याप्रसंगी खा. तडस म्हणाले. त्यानंतर तळेगांव रघूजी या गावाला भेट देण्यात आली. तेथे कुठल्याही प्रकारच्या जलस्त्रोतातून पाणी उपलब्ध नाही असे लक्षात आले. तेव्हा ग्रा.पं.मध्ये ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले. खरांगणा हेटी येथे दोन सिंमेट नाला बांधाची मागणी गावकºयांनी केली. त्यानंतर येळाकेळी धाम उन्नई प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, राजू राठी, राजश्री राठी, नितीन अरबट, सरपंच रेखा वाघमारे, निलीमा अक्कलवार, नम्रता आंभोरे, तळेगाव रघुजीच्या सरपंच प्रभा कालोकार, उपसरपंच धनराज गहाट, वर्धा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र डाफने आदींची उपस्थिती होती.