जिल्हाधिकारी महोदय, मी सिव्हील रस्ता बोलतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:19+5:30
महोदय तसा मी, शहरातील महत्त्वाचा रस्ता बर कां! याच रस्त्यावर स्व. इंदिरा गांधीजी यांचा पुतळा आहे तर थोड्या दूर जाताच तुमच्याच घरासमोर बापूरावजी देशमुख यांचा पुतळा आणि थोड्या दूर अंतरावरच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. याला आपण राजमार्ग असे म्हटल्यास वावगे ठरु नये, याच मार्गावर जिल्ह्याचे मिनीमंत्रालय आहे. तसेच नगरपालिका, बांधकाम विभाग, प्रशासकीय इमारत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकारी महोदय, मी आरती चौक ते गांधी पुतळयापर्यंतचा रस्ता बोलतोय, तुमची भेट घ्यावी आपबिती सांगावी, अशी मनापासून इच्छा होती. मात्र, माझ्यासारख्या चिखलाने बरबटलेल्याला कोण तुमच्यापर्यंत घेवून जाणार, म्हणून वेदना असह्य झाल्याने आज तुमच्याशीच बोलतोय.
महोदय तसा मी, शहरातील महत्त्वाचा रस्ता बर कां! याच रस्त्यावर स्व. इंदिरा गांधीजी यांचा पुतळा आहे तर थोड्या दूर जाताच तुमच्याच घरासमोर बापूरावजी देशमुख यांचा पुतळा आणि थोड्या दूर अंतरावरच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. याला आपण राजमार्ग असे म्हटल्यास वावगे ठरु नये, याच मार्गावर जिल्ह्याचे मिनीमंत्रालय आहे. तसेच नगरपालिका, बांधकाम विभाग, प्रशासकीय इमारत आहे. इतकेच नव्हेतर न्यायाधीशांचे निवासस्थान, तुमचे स्वत:चे निवासस्थान, पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान, जिल्हा शल्यचिकित्सकांचे निवासस्थानांसह आदी विविध शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून माजी वेदना कुणी समजूनच घेत नाही. वर्षभरापूर्वी माझ्या कडेला गिट्टी पडली. मला वाटले आतातरी दिवस पालटतील मात्र, त्यादिवसानंतर माझे दिवसच फिरले. केवळ खड्ड्यांची डागडुजीच करण्यात आली. झाडे झुडपे वाढले असून माझा श्वासही घोटत आहे. थातुरमातुर गिट्टी अंथरली. माती की, मुरुम अंथरला, डांबराच्या नावाखाली काही तर काळेबेरे टाकले. अनेकांनी तक्रारीही केल्या. पण, ‘राजा बोले दल हाले’ या न्यायाने कंत्राटदार वाकूल्या दाखवून निघून गेला. तो गेल्याबरोबर माझ्यावरच्या डांबर नाव दिलेल्या रसायनाने विद्रोह पुकारला. गिट्टीने साथ सोडली. मुरमाने आपल्या मुळ मातीचे रंग दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मी आजपर्यंत असाच कन्हत आहे.
आज माझी अवस्था पांदण रस्त्यासारखी झाली आहे. माझे ऐवढे मोठे वैभव पाहिलेले जेष्ठ आज मला शिव्याशाप घालताना दिसत आहे. सांगा यात माझा काय दोष. एका बाजूने खोदून ठेवले असून चिखलाने संपूर्ण आवरण तयार झाले आहे. अनेक नागरिक माझ्यावर अंथरलेल्या चिखलावरुन घसरत आहेत. त्यांना गंभीर इजा पोहचत आहे. तुमच्याजवळ या वेदना मी मांडताना अश्रू अनावर होतात. पण, नगर पालिकेला मात्र, हंबरडा फूटत नसल्याने आता तुम्हीच याचे निराकरण कराल, अशी अपेक्षा आहे.
आधीच उपेक्षा त्यात वाढला दाह
जिल्हाधिकारी महोदय, मी खासखळग्याचा असलो तरी शितलता देत होतो. मात्र, माझा ‘मेक ओव्हर’ करण्याची टुम निघाली. माझ्या अंगाखांद्यावर नटलेली हिरवीगार झाडे शहीद केली गेली. तेव्हापासून जीव तळमळतो आहे. पण, याला इलाज नाही.
एकदा न्यायाचे तराजू उचलाच
महोदय, लोकशाहीत आपण जिल्ह्याचे राजे आहात. न्यायही तुम्हालाच द्यावा लागणार. आज माझी अवस्था बिकट झाली आहे. माझ्याकडे कुणाचेच लक्ष नाही. माझ्यावर सध्या शिव्यांचा भडीमार होत आहे. कंत्राटदाराचेही लक्ष नाही. त्यामुळे तुम्हीच आता न्यायाचे तराजू उचलून कंत्राटदाराचे कान पिचकून मला न्याय द्या, ही माझी तुमच्याकडे विनंती आहे.