साहेब वाघ दोनदा येऊन गेला; आता काय आम्ही शेतात जाणे सोडायचे का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 05:00 AM2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:36+5:30
पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तारासावंगा : तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चीचकुंभ, पेठ माणिकवाडा व जामगाव शेतशिवारात पट्टेदार व बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू असून तारासावंगा परिसरात वाघाने २१ फेब्रुवारी रोजी पेठमधील शेतकरी अशोक ठोंबरे यांच्या मालकीच्या वासरावर हल्ला चढवून जखमी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले.
पण, वासरू गंभीर जखमी झाले. याची माहिती वनविभागाला दिली असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. झालेल्या नुकसानीसाठी जखमी झालेल्या वासराच्या औषधोपचाराचे बिल जवळ ठेवा, औषधोपचारासाठी लागलेला खर्च वनविभागाच्या वतीने देण्यात येईल, अशा सूचना दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशीही वाघाने त्याच शेतात आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती वनविभागाला दिली. परंतु वनविभागाने चार ते पाच दिवस तुम्ही घरीच जनावरे बांधा अशी उत्तरे दिल्याने वनविभागही वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत असेल तर अशात दिवसरात्र रब्बी पिकांच्या रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मदत मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी, मजुरांच्या अडचणीत भर
- सध्या गहू व चणा आदी पिकांची निगा शेतकरी राखत असताना शेत शिवारातही वाघ मुक्त संचार करीत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे.
- मागील एका महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले होत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा
- सेलू (घोराड) : किन्ही शिवारात असलेल्या प्रदीप रामकृष्ण राऊत यांच्या शेतातील गोठ्याबाहेर बांधून असलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिला ठार मारले. ही घटना गुरुवार २४ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
- किन्ही जखळा पांदण रस्त्याला लागून असलेल्या राऊत यांच्या शेतासह लगतच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. सध्या शेतात रात्रीच्या वेळी शेतकरी जागलीसाठी जात आहेत. अशावेळी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.