महामार्गांवर अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले ‘मृत्यूंजय दूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 05:00 AM2022-03-25T05:00:00+5:302022-03-25T05:00:27+5:30
जाम महामार्ग पोलिसांनी ‘मृत्यूंजय दूत’ योजनेसाठी ५२ मदत करणाऱ्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या स्वयंसेवकांना महामार्ग पोलीस विभागाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक २० कि.मी.च्या अंतरामध्ये पाच ते सात जणांचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे प्रथमोपचार पेटी आणि स्ट्रेचर देण्यात आले आहे. जवळील डॉक्टर आणि दवाखान्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना अनेकवेळा तातडीने वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता. यातून मार्ग काढण्यासाठी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मृत्यूंजय दूत’ धावून आले असून महामार्गावरील १८ ते २० दूत अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून तत्काळ पोलिसांना माहिती देत त्यांची मदत करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. महामार्गावरील अपघात हा नेहमीच चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून ‘मृत्यूंजय दूत’ योजना सुरू करण्यात आली आहे.
महामार्ग पोलिसांकडून केली जातेय जनजागृती
महामार्ग पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, स्नेहल राऊत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, सुधाकर कुमरे, देवेंद्र पटले यांच्यासह सर्व पोलिसांकडून महामार्गावर येणाऱ्या गावांतील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत समुपदेशन करून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
५२ दूतांची होतेय मदत