महावितरण देतेय साडेतीन लाख ग्राहकांना ‘हर पल की खबर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:01+5:30
विद्युत पुरवठ्यावर बरीचशी कामे अवलंबून असल्याने तो अचानक खंडित झाला तर आपले नियोजन चूकते. शिवाय महत्त्वाची कामेही ठप्प पडतात. हे नियोजन चुकू नये, म्हणून ग्राहकाला विद्युत पुरवठा खंडित होण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविला जातो. ज्यामध्ये आपला विद्युत पुरवठा कधी बंद राहील, याची पूर्वसूचना दिली जाते.
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महावितरणकडूनवीज ग्राहकांना मोबाईल एसएमएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने वर्धा जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार ९५५ वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. पण, जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार ४०८ वीज ग्राहकांनी अद्यापही आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहे. परिणामी, महावितरणकडून दिले जाणारे संदेश या वीज ग्राहकांपर्यंत पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्युत पुरवठ्यावर बरीचशी कामे अवलंबून असल्याने तो अचानक खंडित झाला तर आपले नियोजन चूकते. शिवाय महत्त्वाची कामेही ठप्प पडतात. हे नियोजन चुकू नये, म्हणून ग्राहकाला विद्युत पुरवठा खंडित होण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविला जातो. ज्यामध्ये आपला विद्युत पुरवठा कधी बंद राहील, याची पूर्वसूचना दिली जाते. महावितरणकडे विद्युत ग्राहकांचा मोबाईल क्रमांक असल्यास अकस्मात वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण, विद्युत ग्राहकांच्या घरी मिटर वाचन करणारा कधी आणि किती वाजता येणार, वीज ग्राहकाने विशिष्ट कालावधीत किती युनिटचा वापर केला, किती रुपयांचे देयके भरले, याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून वीज ग्राहकास दिल्या जाते. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ३५७ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ३ लाख २९ हजार ९५५ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची माहिती महावितरणकडे दिली असून ६७ हजार ४०८ वीजग्राहकांनी अद्यापही मोबाईल क्रमांक नोंदविण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात २१ वीज देयक भरणा केंद्र सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून बंद करण्यात आलेले वीज भरणा केंद्र २१ ठिकाणी सुरू केल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली आहे. वर्धा जिल्हा ग्रीन श्रेणीत येत असल्याने वीज भरणा केंद्र सुरु करण्यासाठी महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मे पासून वर्धा, सेलू आणि देवळी येथील खासगी १७ आणि महावितरणचे चार असे एकूण २१ वीज देयक भरणा केेंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. महावितरणकडून सध्या छापील देयकाची प्रत वितरित करणे बंद केले आहे. यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाची रक्कम भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीज बिल भरणा संस्था चालकांची बैठक
महावितरणचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे यांनी त्यांच्या कार्यालयात वीज बिल भरणा संस्था चालकांची बैठक घेतली. बैठकीत शासनाने केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून केंद्र सुरू करावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, सॅनिटायझरची व्यवस्था करावी आदी सूचना दिल्या. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी सुरु असलेल्या वीज बिल भरणा केंद्रांवर जाऊन थकीत देयकाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.