महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन
By महेश सायखेडे | Updated: June 6, 2023 18:19 IST2023-06-06T18:19:08+5:302023-06-06T18:19:35+5:30
रापम पाठविणार ५९ जादा बसेस

महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन
वर्धा : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस वारकऱ्यांसह अनेकांना असते. आषाढी एकादशीचे औचित्य साधून रापमच्या वर्धा विभागाने जिल्ह्यातील पाचही आगारातून तब्बल ५९ जादा बसेस पंढरपूरला पाठविण्याचे नियोजन केले आहे. ही विशेष बस सेवा २३ जूनपासून सुरू होणार असून या बसेसमध्ये महिलांना महिला सन्मान योजना तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देत प्रवास भाड्यात मोठी सवलत दिली जाणार आहे. एकूणच वर्ध्यातील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना सुमारे ५०० रुपयांतच पंढरपूर गाठून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता घेणार आहे.
पाच आगारांमधून सोडणार ५९ बसेस
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत. या पाचही आगारांमधून आषाढी एकादशीचे औचित्य साधून २३ जूनपासून विशेष बसेस पंढरपूरच्या दिशेने सोडल्या जाणार आहेत. वर्धा, आर्वी, हिंगणघाट, तळेगाव, पुलगाव या पाचही आगारांमधून एकूण ५९ बसेस सोडल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कुठल्या आगारातून किती बसेस सोडणार?
वर्धा : २४
आर्वी : १२
हिंगणघाट : १५
तळेगाव : ०३
पुलगाव : ०५
वयोवृद्धांना बसचा प्रवास मोफत
महिलांना महिला सन्मान योजना तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देत प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा जिल्ह्यातील पाच आगारांमधून सोडण्यात येणाऱ्या ५९ बसेसमध्ये ही सवलत प्रवाशांना मिळणार आहे. शिवाय वयोवृद्ध म्हणजे ७५ वर्षांपुढील वयोवृद्धांना संबंधित बसेसमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचा लाभ देत त्यांच्याकडून कुठलेही प्रवास भाडे स्वीकारले जाणार नाही. एकूणच वयोवृद्धांना मोफत प्रवास सेवेचा लाभ दिला जाणार आहे.
ॲडव्हान्स बुकिंगची सुविधा
गावकरी समूह, वारकरी समूह, भजनी मंडळ, मंदिर समिती या सारख्या समूहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी म्हणून रापमच्या वतीने ॲडव्हान्स बुकिंगची सुविधा पाचही आगार व बसस्थानकांवर केली आहे.
कुठून कुणाला किती लागेल प्रवास भाडे?
कुठून कुठंपर्यंत - अंतर : पूर्ण तिकीट : ज्येष्ठ नागरिक तिकीट : महिलांकरिता तिकीट
वर्धा ते पंढरपूर - ६२४ किमी : ९०५ रुपये : ४५५ रुपये : ४५५ रुपये
आर्वी ते पंढरपूर - ६१६ किमी : ८९५ रुपये : ४५० रुपये : ४५० रुपये
हिंगणघाट ते पंढरपूर - ७३२ किमी : १०६० रुपये : ५३० रुपये : ५३० रुपये
तळेगाव ते पंढरपूर - ६५४ किमी : ९५० रुपये : ४८० रुपये : ४८० रुपये
पुलगाव ते पंढरपूर - ६१२ किमी : ८९० रुपये : ४५० रुपये : ४५० रुपये