जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील म्युकरमायकोसिस बाधित जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:00 AM2021-06-02T05:00:00+5:302021-06-02T05:00:27+5:30

साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे.

Mucus mycosis in the age group of 45 to 60 years in the district | जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील म्युकरमायकोसिस बाधित जादा

जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील म्युकरमायकोसिस बाधित जादा

Next
ठळक मुद्देएकाचा घेतला बळी : १९ रुग्णांना मिळाली रुग्णालयातून सुटी

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडची पहिली आणि दुसरी लाट निवळली असली तरी सध्या म्युकरमायकोसिस हा आजार सध्या डोके वर काढू पाहात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे तब्बल ८१ रुग्ण ट्रेस झाले असून, या आजाराने एकाचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३९ बाधित हे ४५ ते ६० वयोगटातील आहेत. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. 
बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीच विविध आजार असलेल्यांना होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणाराच आहे. त्यामुळे कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे सध्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान ठरू पाहात आहे. साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी १९ व्यक्तिंना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या ६१ व्यक्तींवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस बाधितांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 
 

सर्वाधिक मधुमेहींनाच कवेत घेतोय म्युकरमायकोसिस
जिल्ह्यातील ८१ म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये मधुमेह असलेल्या ६८, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले २८, तर दीर्घकालीन आजार असलेल्या २९ व्यक्तिंचा समावेश असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

५६ व्यक्तींना द्यावा लागला होता प्राणवायू
जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी ५६ व्यक्तिंना या आजाराची लागण होण्यापूर्वी प्राणवायू द्यावा लागला होता. उर्वरित २५ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला नव्हता, अशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे कोविडमुक्त झालेल्या प्रत्येक रुग्णाने अधिकची दक्षता घेणे गरजेचे आहे.

३८ रुग्णांना द्यावे लागले होते स्टेरॉईड
- कोविडचा संसर्ग झाल्याने गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी स्टेरॉईड दिले जाते. अशाच ३८ रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे निदान झाले आहे. असे असले तरी उर्वरित ४३ म्युकरमायकोसिस बाधितांची स्टेराॅईड थेअरपीबाबतची हिस्ट्री  नाही. परंतु, त्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

कोविडमुक्त नाहीत; पण तीन व्यक्तींना झाली म्युकरची लागण
- ८१ म्युकरमायकोसिस बाधितांपैकी ७८ व्यक्तिंना यापूर्वी कोविडचा संसर्ग झाला होता, तर तीन व्यक्तिंना कोविडचा संसर्ग झाला नसला तरी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने कोविडसोबतच म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

म्युकरमायकोसिस बाधितांत पुरुष सर्वाधिक
- जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात ६२ पुरुष, तर १९ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकूणच म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये पुरुषच सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पुरुषांनी सर्वाधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, १९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.
- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

Web Title: Mucus mycosis in the age group of 45 to 60 years in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.