२७२ एकरांवर तुतीची लागवड पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:58 PM2018-12-28T23:58:21+5:302018-12-28T23:58:41+5:30
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेती करण्यात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वल असून सेलू तालुका द्वितीय स्थानी असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. ३५३ शेतकऱ्यांकडून केल्या जात असलेल्या रेशीम शेतीमुळे सुमारे २ हजार ९० गरजूंना रोजगार मिळत आहे. पारंपरिक शेती ही न परवडणारी असल्याचे लक्षात आल्यावर सदर कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात रेशीम शेतीकडे वळल्याचे सांगण्यात येते.
रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासन मनरेगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान देते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड होऊन शेतकरी सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनीही रेशीम शेती करावी, यासाठी संबंधित विभागाच्यावतीने प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.
१०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य
रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला मनरेगाअंतर्गत एकरी २ लाख ९२ हजार ६२५ रुपयांचे अर्थसहाय्य १०० टक्के अनुदानावर दिले जाते. इतकेच नव्हे, तर एससी, एसटी व एनटी तसेच महिला कुटुंब प्रमुख प्रवर्गातील शेतकऱ्याला जमिनीची मर्यादेची अट वगळता एकरी तितकेच अर्थसहाय्य केले जाते. शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत तुतीची जोपासना करीत भरघोस उत्पन्न घ्यावे, हा शासकीय अनुदान देण्यामागील मुख्य उद्देश आहे.
उद्योगावर उपराजधानीत होते शिक्कामोर्तब
रेशीम कोश प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भातील प्रस्ताव वर्धेत जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयात स्वीकारले जात असले तरी प्राप्त आवेदन मंजुरीसाठी नागपूर येथील कार्यालयात पाठविले जातात. तेथेच त्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होते. यंदा प्राप्त झालेला एक प्रस्ताव उपराजधानीतील कार्यालयात पाठविण्यात आला होता. तर मागीलवर्षी एकही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता.
रेशीम धागा तयार करण्याचा उद्योग नाचणगावात
जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने रेशीम शेतीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १५ ते २९ डिसेंबर हा कालावधी जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत शेतकऱ्याना रेशीम शेतीचे फायदे पटवून देण्यात येतात. असे असले तरी थेट रेशीम धागा तयार करण्याचा एकमेव उद्योग देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे असल्याचे सांगण्यात आले.
गुणवंत कुचेवार यांचा प्रस्ताव फेटाळला
यंदाच्या वर्षी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला गुणवंत कुचेवार नामक तरुणाचा रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाला होता. तो कार्यालयाने नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. परंतु, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत २७२ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य केले जाते. मागील वर्षी रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नव्हता. यंदा कुचेवार यांचा प्रस्ताव आला होता. तो नामंजूर झाला आहे.
- प्यारेसिंग पाडवी,रेशीम विकास अधिकारी, वर्धा.