पालिकेच्या कचऱ्याचा नांदगावच्या नागरिकांना त्रास
By admin | Published: April 10, 2015 01:40 AM2015-04-10T01:40:26+5:302015-04-10T01:40:26+5:30
नांदगाव (बोर) येथे स्थानिक नगर पालिकेचा कचराडेपो आहे़ या कचऱ्यामुळे नांदगाव येथील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे़ ...
हिंगणघाट : नांदगाव (बोर) येथे स्थानिक नगर पालिकेचा कचराडेपो आहे़ या कचऱ्यामुळे नांदगाव येथील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे़ गावाशेजारील कचराडेपो व त्यातील दुर्गंधी यामुळे ग्रामस्थांना टीबी, अस्थमा, कावीळ आदी आजार जडत असल्याचे निदर्शनास येत आहे़ पालिकेला कचरा डेपोसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना ग्रा़पं़ ने काही अटी घातल्या होत्या़ त्या अटींची पूर्तता करण्यात आली नाही़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़
कचराडेपोमुळे कुठलेही दूषित पाणी, घाण व वायुप्रदूषण होणार नाही़ सदर वीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेतून गावात पथदिव्यांना लागणारी वीज अनुदान दराने कायम स्वरूपात ग्रा़प़ ला देण्यात येईल़ गांडूळ प्रकल्पातून निर्माण होणारे गांडूळ खत नांदगावच्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कायमस्वरूपी देण्यात येईल़ या अटीवर नांदगाव ग्रा़पं़ ने प्रकल्पास मान्यता दिली; पण पालिकेने यापैकी कोणतीही अट पूर्ण केली नाही़ या डेपोमधून वाहणारे दूषित पाणी नाल्यातून थेट नांदगाव येथून नदीत जाते़ सदर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याने ते नळाद्वारे नागरिकांना मिळते़ यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे़ कावीळ, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे़ आजारांमुळे चार रुग्णांचे बळी गेले़ या डेपोमधील चकरा सतत जळत राहिल्याने गावात दूषित वारे वाहत असते़ कुठलाही प्रकल्प सुरू नाही़ या प्रकरणी चौकशी करून नांदगाव येथील नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत हा प्रकल्प अन्य हलविण्याचे पालिकेला आदेश द्यावे, अशी मागणी प्रहारने निवेदनातून केली आहे़(तालुका प्रतिनिधी)