वर्दळीच्या स्थळी पालिकेचे ‘पे अॅण्ड पार्क’
By admin | Published: January 9, 2017 01:18 AM2017-01-09T01:18:39+5:302017-01-09T01:18:39+5:30
शहरात असलेली पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता बजाज चौक परिसरात वाहतूक शाखा कार्यालयाच्या
तात्पुरती होणार सुविधा : बजाज चौकात वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता
वर्धा : शहरात असलेली पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता बजाज चौक परिसरात वाहतूक शाखा कार्यालयाच्या भिंतीलगत नगर परिषदेच्यावतीने ‘पे अॅण्ड पार्कींग’ सुविधा सुरू करण्यात आली आहे; पण या पार्कींगमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन चौकात पालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या पार्किंगच्या
सुविधेमुळे शहरात अतिक्रमणाला चालना मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
वर्धेत पार्कींगची समस्या गत कित्येक वर्षांपासून आ वासून आहे. यावर मार्ग काढण्याकरिता अनेकवेळा बैठका झाल्या. काही नकाशेही सादर करण्यात आलेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन काही निर्देशही देण्यात आलेत. या निर्देशानुसार काम करण्याची गरज असताना पालिका प्रशासनाच्यावतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावर काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
विलंबाने का होईना, पालिकेच्यावतीने ही समस्या मार्गी लावण्याकरिता पार्कींग सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मुख्य मार्गावर बजाज चौक परिसरात रस्त्याच्या कडेला पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी या पार्कींग व्यवस्थेमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा विचार पालिका प्रशासनाकडून झाला नसल्याचेच दिसून येत आहे.
शहरात वाढत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करणे गरजेचे असताना, रस्ता मोकळा करण्याऐवजी पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करीत पार्किंगची सोय करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भर चौकात करण्यात येत असलेल्या या पार्कींगमुळे शहरात अतिक्रमण करण्याची मुभा तर पालिका देत नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू आहे.(प्रतिनिधी)
४शहरातील बजाज चौकात वाहतूक पोलीस नियमित कर्तव्यावर असतात. येथे त्यांच्याकडून वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. ती वाहने या पार्किंगच्या समोरच उभी राहतात. यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय नागरिकांची पार्कीगची समस्या काही काळ मार्गी काढण्यासाठी असला तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करण्यात आला नसल्याचेच दिसून येत आहे.
या पार्किंगला पालिकेची परवानगी
४शहरातील बजाज चौक परिसरात होत असलेल्या या पार्किंगला पालिकेच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. याचे कंत्राट ठाकूर नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्याने येथे काम सुरू केले आहे. या पार्कींगमुळे वाहतुकीची अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलिसांचीच
होती मागणी
४वाहतूक शाखेजवळ असलेल्या त्रिकोणी जागेवरून होणारी वाहतूक डोकेदुखी ठरत होती. येथून मोठ्या प्रमाणात आॅटोची वाहतूक होत होती. या अवैध वाहतुकीवर आळा घालण्याकरिता वाहतूक पोलिसांकडूनच या जागेवर पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय कोणत्या जागेपासून कुठपर्यंत पार्कींग करता येईल, याची माहिती व आखणी वाहतूक पोलिसांनीच करून दिली.
आणखी आठ ठिकाणी पार्कींगची सोय
४शहरातील पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता पालिकेद्वारे आणखी आठ ठिकाणी अशी पार्किंगची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शहरात पार्किंगची सुविधा करण्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे जागा उपलब्ध करून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यात बजाज चौक परिसरात वाहतूक पोलिसांनीच दिलेली जागा आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनीच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याकरिता त्यांनीच जागेची आखणी करून दिली आहे. अशी व्यवस्था आणखी काही ठिकाणी करण्यात येणार आहे.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.