नळ नसेल तर पोहोचतो नगरपालिकेचा टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:42 PM2019-05-11T23:42:34+5:302019-05-11T23:42:55+5:30
शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत. ‘लोकमत’ने शनिवारी सकाळी ‘टँकरवारी’चा आढावा घेतला. ज्या भागात नळाचा पाणीपुरवठा १० दिवसानंतर होत आहे, त्या भागातील वॉर्ड व प्रभागात टँकर पाठविला जातो. या भागातील नागरिकांनी आपल्या घरासमोर प्लास्टिक ड्रम ठेवलेले आहेत. प्रत्येक घराला १ ड्रम याप्रमाणे पाणी वाटप नगरपालिकेचा टँकर करतो, असे दिसून आले. नगरपालिकेचा टँकर आल्यावर काही भागात नगरसेवक टँकरसोबत असल्याचेही दिसून आले. वॉर्डातील प्रत्येक भागात नागरिकाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले तर शहराला पाणी पुरवठा होईल आणि टँकर बंद होतील, अशी माहिती मिळाली. शहरातील गोंड प्लॉट, केजाजी चौक या भागात एप्रिल महिन्यापासून प्रदीप तलमले मित्र परिवार असा फलक लावलेला टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करीत असल्याचे दिसून आले. गांधीनगर भागात गेल्या आठवडाभरापासून नळ आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात टँकर आला तरी एकच ड्रम पाणी दिले जाते. हे अपुरे असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड ओरड होत आहे.
सिंदी (मेघे) येथे सहा वॉर्डांकरिता एकच टँकर
वर्धा शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतींच्या हद्दीत सहा वॉर्डाला एक टँकर पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे दिवसभरात टँकर कधीही कोणत्याही भागात येऊन धडकतो. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना दिवसभर टँकरची प्रतीक्षा करावी लागते. लोकमतची चमू ज्यावेळी गावात गेली, त्यावेळी वॉर्ड क्र.३ वॉर्ड क्र.२ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बरेचजण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवत असल्याचे दिसून आले. टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.
चौथ्या माळ्यावर पाणी हवे, द्या सतराशे!
वर्धा शहरातील पाणी पुरवठ्याचा लोकमतने शनिवारी आढावा घेतला. दरम्यान, दुपारी १२.३० वाजता लोकमत चमू शहरातील बाजारपेठेत पोहोचली. यावेळी हिरालाल रामप्रकाश या कापड दुकानाच्या बाजूला पारस आईस फॅक्टरीसमोर कार्यालय असलेल्या एका टँकर मालकाचा टँकर पाणीपुरवठा करताना दिसला. या ठिकाणी लोकमतने चौकशी केली तर पहिल्या ते चौथ्या माळ्यापर्यंत पाणी चढवून द्यायचे असेल तर सतराशे रुपये घेतले जातात. खालीच पाणी उतरवायचे असेल तर १ हजार रुपयाला टँकर दिला जातो. आपल्यालाही हवा असेल तर आमच्या कार्यालयात संपर्क साधा, असे या ट्रॅक्टरच्या चालकाने सांगितले. आमच्याकडे दिवसभर जे लोक टँकर बुक करतात, त्यांना आम्ही पाणीपुरवठा करतो, असे ते म्हणाले.
मुस्लिमबहुल भागात पाणी वाटपात पक्षपात
वर्धा शहराच्या महादेवपुरा येथील प्रभाग क्र.५ आणि ६ मध्ये नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या भागात पाणीपुरवठा करताना पक्षपात केला जात असल्याची तक्रार नगरपालिकेचे बांधकाम सभापती व नगरसेवक नौशाद शेख यांनी लोकमतकडे केली आहे. या भागात बहुतांश मुस्लिम बांधव रहिवासी आहेत. त्यांचे सध्या रोजे सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. शिवाय त्यांना वेळेत पाणी मिळणेही गरजेचे आहे. असे असताना या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक येऊन ड्रमचे-ड्रम पाणी घेऊन जात आहे. यावर कुणाचाही अंकुश नाही, अशी माहिती नौशाद शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.