पालिका प्रशासनाला ठरावाचा विसर
By admin | Published: April 5, 2015 02:02 AM2015-04-05T02:02:00+5:302015-04-05T02:02:00+5:30
हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
वर्धा : हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. २००१ मध्ये स्थानिक प्रशासनाने श्रद्धानंद प्राथमिक शाळेजवळ काही गाळे बांधून देण्याचा ठराव घेतला होता; पण अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे पालिका प्रशासनाला या ठरावाचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
हिंगणघाट शहरात १९९८ मध्ये पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती़ त्यावेळी अतिक्रमणात ज्यांची दुकाने गेली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीच्यावतीने ८ आॅगस्ट २००१ रोजी सभा घेऊन एक ठराव पारित करण्यात आला होता़ या ठरावानुसार श्रद्धानंद प्राथमिक शाळेच्या पुर्वेकडील भागात २० दुकाने बांधून देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते़ या परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे ही या सभेत मंजूर करण्यात आले होते़ त्यानुसार २७ सप्टेंबर २००१ रोजी काही व्यावसायिकांनी दुकानांसाठी काही पैसेही पालिकेकडे जमा केले होते़ शिवाय आवश्यक ती संपूर्ण कारवाईही पूर्ण करण्यात आली होती़ आज या ठरावाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही २००१ च्या ठरावावर कारवाई करण्यात आलेली नाही़ श्रद्धानंद शाळेजवळ गाळे बांधण्याच्या कामलाही सुरूवात झाली नाही. या प्रकारामुळे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तर पालिका प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ १९९८ मध्ये काढलेल्या अतिक्रमणातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप केले नाही़ आता पुन्हा तीच कारवाई झाल्याने बेरोजगारांचे काय, हा प्रश्नच आहे़ यामुळे या कामाला त्वरित सुरूवात करावी व २० गाळे बांधून द्यावे, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)