कर वसुलीकरिता पालिका वाजविते बॅण्ड
By admin | Published: March 7, 2017 01:13 AM2017-03-07T01:13:06+5:302017-03-07T01:13:06+5:30
थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता पालिकेच्यावतीने विविध उपायोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.
एकाच दिवसात पाऊणलाखाची वसुली
वर्धा : थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता पालिकेच्यावतीने विविध उपायोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे पालिकेच्यावतीने थकबाकीदाराच्या घरासमोर किंवा त्याच्या प्रतिष्ठानासमोर बॅण्ड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याचा परिणाम होत असून थकबाकीदार थेट तिथेचे आलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम देत आहेत. सोमवारी राबविलेल्या या उपक्रमात दुपारपर्यंत एकूण पाऊणलाख रुपयांचा कर जमा झाल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
शहरातील अनेकांकडे मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये थकले आहे. या थकबाकीच्या वसुलीकरिता त्यांना नोटीसी बजावल्या, अनेक करदात्यांची मालमत्ता सिलही केली. असे असतानाही अनेकांकडून थकीत करावा भरणा झाला नाही. परिणामी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करदात्यांच्या घरांसमोर जात बॅण्ड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला. याचा लाभही होताना दिसून येत आहे. आज पालिकेचे कर वसुलीपथक आर्वी मार्गावरील थकबाकीदार सुभाष रामचंद्र मुडे यांनी २० हजार १७८ तर सुरेश जोशी आणि शांता नरड यांनीही बँड नका वाजवू थकबाकीची रक्कम घेवून जा म्हणत ५१ हजार ८९९ रुपयांचा धनादेश कर्मचाऱ्यांच्या हवाली केला आहे.
कार्यवाहीच्यावेळी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे यांच्यासह गजानन पेटकर, विजय किनगावकर, स्वप्नील खंडारे, अविनाश मरघडे, दिलीप कुथे, अमोल कोडापे यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
थकबाकीदरांच्या घरासमोर बॅण्ड वाजविण्याची योजना या मोहिमेच्या प्रारंभीच राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार टाळावा असे सांगण्यात आले होते. मात्र थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर हा मार्ग स्वीकरण्याचा निर्णय घेण्यात आला.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, वर्धा.