वर्ध्यात बापूंच्या कार्याची भित्ती शिल्पे उलगडणार इतिहासाची पाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:10 PM2019-08-01T15:10:01+5:302019-08-01T15:10:43+5:30
वर्ध्यातील गांधीजींचा पुतळा हा जिल्हा प्रशासन परिसर आणि सेवाग्राम वर्धा या मुख्य मार्गावर आहे. तिथेच अर्धवर्तुळाकार भागात बापूंच्या कार्यावरील शिल्प लावण्यात आलेले असून त्यावर कालाकार आपले काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्हा गांधीजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो. ही त्यांची कर्मभूमी राहिली आहे. दोन्ही महामानवांचे कार्य सदैव राष्ट्र आणि मानवी विकासासाठी राहिलेले आहे. वर्ध्यातील गांधीजींचा पुतळा हा जिल्हा प्रशासन परिसर आणि सेवाग्राम वर्धा या मुख्य मार्गावर आहे. या मार्गाचे आणि चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून तिथेच अर्धवर्तुळाकार भागात बापूंच्या कार्यावरील शिल्प लावण्यात आलेले असून त्यावर कालाकार आपले काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
भव्य शिल्पात बापू, बा आणि मीरा बहन आहेत तर अन्य शिल्पांमध्ये मिठाचा सत्याग्रह, पं.परचुरे शास्त्री यांच्यावर उपचार, पदयात्रा, सभा, ग्रामोद्योग, चरखा इ. तयार करण्यात आलेले आहे.
गांधीजींनी आपल्या जीवनात कार्यकर्त्यासह जे सत्याग्रह आणि रचनात्मक कार्य केले यांचा सर्व उल्लेख यात आहे. या शिल्पातून बापूंचे कार्य दाखविण्यात आल्याने भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण गोष्टी अधोरेखित केल्याने युवा पिढीसमोर आदर्श निर्माणाचे काम यातून होणार आहे.
सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत असलेले हे काम मुंबईतील जे.जे स्कूल आॅफ आर्टसचे कलाकार करीत आहेत.