दारूच्या वादातून युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:54 PM2017-08-19T21:54:16+5:302017-08-19T21:54:31+5:30
वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सत्यम बार येथे दारू पिण्याकरिता गेलेल्या युवकांत वाद झाला. यात दोघांनी एकाला धारदार शस्त्राने मारहाण करून ठार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सत्यम बार येथे दारू पिण्याकरिता गेलेल्या युवकांत वाद झाला. यात दोघांनी एकाला धारदार शस्त्राने मारहाण करून ठार केले. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास विटाळा परिसरात घडली. सदर घटनास्थळ अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तर मृतक पुलगाव शहरातील शिवाजी कॉलनी येथील असून चेतन मनोहर राऊत (२३) असे त्याचे नाव असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून मंगरूळ पोलिसांच्या हवाली केले आहे. अटकेतील आरोपीचे नाव सुरेंद्र तेलंगे रा. गुंजखेडा व समीर चौधरी रा. वल्लभनगर अशी असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, महेश राऊत व चेतन राऊत दोन्ही रा. शिवाजी कॉलनी हे शनिवारी दारू पिण्याकरिता सत्यम बार येथे गेले होते. दरम्यान, याच ठिकाणी सुरेंद्र तेलंगे रा. गुंजखेडा व समीर चौधरी रा. वल्लभनगर हे देखील पोहोचले. मद्यपानानंतर काही कारणावरून चेतनसोबत समीर व सुरेंद्र या दोघांचा वाद झाला. हा वाद विकोपाला जावून त्या दोघांनी विटाळा परिसरात चेतनवर धारदार शस्त्राने वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी अवस्थेत चेतनला महेश राऊतने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.
सदर घटना मंगरूळ (दस्तगिर) पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने प्रकरण त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी आरोपी व मृतक पुलगाव येथील असल्याने पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले होते.