दारूच्या कारणातून युवकाची, तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:15+5:30
मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी गावात दारु चोरल्याच्या कारणातून युवकास विहिरीत ढकलून देत हत्या करण्यात आली तर वर्ध्याच्या गिरीपेठ परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. इतकेच नव्हेतर एक दिवसापूर्वी श्वानाला दगड मारण्याच्या कारणातून भारतीय खाद्य निगम परिसरातील झोडप ट्टी परिसरात व्यक्तीची हत्या करण्यात आली. तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या असून या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एकंदरीत चित्र बघता जिल्ह्याचा ‘क्राईम रेट’ वाढत असून कायद्याचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.
मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला. मुलाला मारत असल्याचे पाहून तिची आई दीपमाला या वाचविण्यासाठी मधात गेली. आरोपी विनोद याने दीपमाला यांच्यावरही चाकूने वार केले. गंभीर झालेल्या मयुरी आणि तिची आई दीपमाला यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींनाही नागपूर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मयुरी उरकुडे हिचा मृत्यू झाला. तर दीपमाला नेहारे या गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे दारु चोरल्याच्या वादातून युवकाला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली. यादव चिडाम आणि बालू उर्फ प्रवीण शालीकराम खुरसंगे हे दोघे गावातीलच सार्वजनिक विहिरीवर बसून होते. दरम्यान यादव चिडाम यांचे मोठे भाऊ उद्धव चिडाम हे तेथे गेले असता बालू खुरसंगे याने यादवला तु माझी मोहाच्या दारुची डबकी का चोरुन नेली. या कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.
उद्धव चिडाम याला काही समजताच बालू उर्फ प्रवीण खुरसंगे याने यादव चिडाम याची कॉलर पकडून त्याचे डोके विहिरीवर असलेल्या खिराडीवर आपटले तसेच मारहाण करुन त्यास विहिरीत ढकलून दिले. उद्धव चिडाम यांनी आरडा ओरडा केला असता बालूने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढयातच उद्धव चिडाम यांचा पुतण्या प्रशांत चिडाम तेथे आला आणि बालू खुरसंगे याला पकडून ठेवले. बालू खुरसंगे याने तेथून पळ काढला. गावातील नागरिकांच्या मदतीने यादव चिडाम यास विहिरीबाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
तर तिसरी घटना वर्ध्यातील भारतीय खाद्य निगम परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडली. या घटेनेत तिघांनी प्रवीण मोहन कांबळे याच्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केला होता. या घटनेतील आरोपी अनिता राईकवार, योगराज राईकवार, दीपक वैरागडे यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी ठोठाविल्यानंतर शनिवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
कायद्याचा धाक संपला का?
शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. वर्चस्व वादातून, तसेच कौटुंबिक कलहातून वाद होत गंभीर घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच खून, खूनाचा प्रयत्न, जबर हाणामारी सारख्या घटना घडत असल्याने कायद्याचा धाक संपला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.