बेपत्ता युवकाची हत्या; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:22 PM2018-11-01T22:22:33+5:302018-11-01T22:23:00+5:30
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबड उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात मधील गांधी धाम येथून आरोपींना अटक केली. सुनील दिलीप हातागडे (१९) वर्ष रा. अशोक नगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबड उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात मधील गांधी धाम येथून आरोपींना अटक केली.
सुनील दिलीप हातागडे (१९) वर्ष रा. अशोक नगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे. सुनील हातागडे व शेख परवेज शेख रशीद रा. तारफैल यांच्या मध्ये वाद होता. या वादातूनच आरोपी परवेज शेख रशीद याने मित्र शेख मोमीन शेख अब्बाज रा. स्टेशन फैल याच्या सहकार्याने सुनीलच्या हत्येचा कट रचला. दोघांनीही २३ आॅक्टोंबर रोजी सुनीलला वाहनात बसवून वायगाव (निपाणी) कडे नेले. वाहनातच परवेजने सुनीलवर धारदार शस्त्राने वार करून ठार मारले. त्यानंतर परवेज व शेख मोमीन हे दोघेही सुनीलचा मृतदेह वाहनात घेवून फिरत राहिले. काही वेळाने गोजी शिवारातील नाल्यात असलेल्या झाडांच्या मागे सुनीलचा मृतदेह फेकुन दिला. या दरम्यान मृतक सुनीलचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्र फिरविले. तेव्हा मृतक सुनील व आरोपी शेख परवेज व शेख मोमीन हे तिघेही हिंगणघाटच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यावरून पोलिसांनी आरोपींना गुजरातच्या गांधीधाम येथून अटक केली असता तब्बल दहा दिवसानंतर या घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी आरोपी शेख परवेज व शेख मोमीन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांची गर्दी
दोन्ही आरोपींचे लोकेशन गुजरातच्या हिंमतनगर येथे दाखविल्याने पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, दिनेश तुमाने व विशाल बंगाले यांनी गुजरात गाठले. याची माहिती गुजरात पोलिसाना देवून आरोपीच्या जावयाकडे पोलिस पोहोचले. भनक लागताच आरोपी पसार झाले. पोलिसांनी पाच दिवस पाळत ठेवत शेख परवेज व शेख मोमीन यांना बुधवारी रात्री गांधीधाम येथून ताब्यात घेतले. आज आरोपींना वर्ध्यांत आणण्यात आले. मृतक सुनीलच्या नातेवाईकांना माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी गर्दी केली. पोलिसांनी यावेळी जमावाला आवरण्यासाठी ठाण्यासमोर तगडा बंदोबस्त लावला होता. आरोपींनी यावेळी गुन्ह्याची कबुली दिली.
...अन् साऱ्यांनाच बसला धक्का
सुनील दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज पोलिसांनी आरोपींना अटक करून आणल्यानंतर दिलेली हत्येची कबुली ऐकून साºयाचा धक्का बसला.