जादूटोण्याच्या संशयावरून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:51 PM2018-02-06T23:51:43+5:302018-02-06T23:52:14+5:30
गायीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील परसोडी येथे मंगळवारी उघड झाली. मृतकाचे नाव वासुदेव सूर्यभान नैताम (४५) असे असून या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघा भावंडांना ताब्यात घेतले आहे.
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : गायीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील परसोडी येथे मंगळवारी उघड झाली. मृतकाचे नाव वासुदेव सूर्यभान नैताम (४५) असे असून या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघा भावंडांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली असून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे मंगेश श्यामराव पेंदाम (२७) व आकाश श्यामराव पेंदाम दोन्ही रा. परसोडी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनी वासुदेवच्या डोळ्यात तिखट टाकून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलीस सुत्रानुसार, गत काही दिवसांपुर्वी मंगेश व आकाश पेंदाम यांच्या गायीची प्रसूती झाली. याच काळात सदर गाय लंगडी झाली. या गायीवर वासुदेव नैताम याने करणी केल्याचा संशय या दोघांना आला. शिवाय याच कारणावरून या दोन्ही परिवारात वादही झाला होता. तेव्हापासूनच या दोघांनी वासुदेवला संपविण्याचा कट रचला.
दरम्यान सोमवारी सायंकाळी वासुदेव त्याच्या शेतात असलेल्या तुरीच्या ढिगाची पाहणी करण्याकरिता जात होता. शेतात एकटाच जात असल्याचे लक्षात येताच आकाश व मंगेश हे दोघे वासुदेव याच्या शेतात जाण्याच्या मार्गावर लपून बसले. वासुदेव जसा समुद्रपूर-परसोडी मार्गावरील पांदण रस्त्यावर आला त्याच वेळी या दोघांनी त्याच्या डोळ्यात तिखट टाकले. यातही वासुदेव सुमारे ८० फुट धावत गेला. येथे पाठलाग करून या दोघांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आज सकाळी सदर घटना पोलीस पाटील राजेंद्र मडावी यांना मिळताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळार सापडलेल्या एका काठीच्या आधारावर व घटनास्थळी न आलेल्या एका परिवारावर हत्येचा संशय व्यक्त झाला. दरम्यान श्वान पथकानेही त्याच घराचा रस्ता दाखविल्याने पोलिसांनी मंगेश आणि आकाश पेंदाम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी हत्येची कबुली दिली. या प्रकरणी पूर्वी अज्ञात आरोपींविरूद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर आरोपीची ओळख पटल्यानंतर यात कलमांची वाढ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश हरनखेडे करीत आहेत.
मृताच्या शरीरावर २० घाव
मृत वासुदेव याच्या शरीराचा पोलिसांनी पंचनामा केला असता त्यावर तब्बल २० घाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे घाव कुºहाडीचे असावे असा संशय पोलिसांचा आहे.
चार वर्षांपूर्वी पोलिसांनी घेतली होती गावात सभा
या गावात जादुटोण्याच्या कारणावरून अनेकवेळा वाद झाले होते. यामुळे सन २०१४ मध्ये या गावात पोलिसांनी जनजागृतीपर सभा घेतली होती. जनजागृतीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर येथे याच कारणाने हत्या झाल्याचे बोलले जात आहे.