संगीत साधना ईश्वर आराधनेचं श्रेष्ठ माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:17 PM2018-02-09T23:17:51+5:302018-02-09T23:18:03+5:30
संगीत लहरी स्पंदनाकडून चेतनेकडे या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीत कर्णतृप्तीसह आत्मिक संवाद साधताना सुरमणी आशिष साबळे यांनी अनेक वर्तमान दाखले देत आधुनिक जीवन शैलीवर भाष्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संगीत लहरी स्पंदनाकडून चेतनेकडे या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीत कर्णतृप्तीसह आत्मिक संवाद साधताना सुरमणी आशिष साबळे यांनी अनेक वर्तमान दाखले देत आधुनिक जीवन शैलीवर भाष्य केले. संगीत साधना हीच प्रत्येक जीवात्म्याचा परतत्त्वासोबत संवाद साधण्याच श्रेष्ठ माध्यम असून प्रत्येकाने स्वत:तील ईश्वरी गुणांना प्रगट केले तरच खºया अर्थाने संत श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला असे समजावे असे सूचक निर्देश सुरमणी आशिष साबळे यांनी दिले.
वैद्यकीय जनजागृती मंच व इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉटर कप स्पर्धेतील ग्राम तथा सामाजिक संस्थांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. विविध रागदारीसह सुपरिचित अभंग आणि भजन गायनाने मैफिलीत रंगत निर्माण झाली आणि भैरवीने सांगता झाली. या मैफिलीच्या निमित्ताने विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख सहसंबंध उपस्थितांनी अनुभवला.
प्रारंभी वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी आयोजनाची भुमिका मांडली. आगामी वॉटर कप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील चार तालुके सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला आ. डॉ. पंकज भोयर, डॉ. उल्हास जाजू, अभ्युदय मेघे आणि चिन्मय फुटाणे, डॉ अरुण पावडे मंचावर उपस्थित होते. आर्वी तालुक्यातील काकडदरा, पिंपळगाव भोसले, बोथली (नटाळा), नेरी (मिरझापुर), माळेगाव -ठेका, सावध (हेटी) , पिंपळखुटा, विरुळ आणि सावंगी (पोळ) या गावांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. पाणी फाउंडेशनचे विदर्भ विभाग समनव्यक चिन्मय फुटाणे यांनी आगामी वॉटर कप स्पर्धेबद्दल माहिती दिली.
विविध सामाजिक संघटनाचा देखील सन्मान स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला. हा सत्कार सुरेश पावडे, राजेंद्र गरपाल, नानासाहेब कराळे, डॉ अरुण पावडे, डॉ. अशोक पावडे, डॉ प्रतिभा पावडे, कोकिळा पावडे, श्रीमती मालुताई पावडे, नलिनी गरपाल, आशा कराळे, प्रभाकर राऊत आणि श्याम भेंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात वर्धा, यवतमाळ आणि आर्वी येथील ४० सामाजिक संस्था आणि निमंत्रिक वर्धेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातून जवळपास १२०० लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले तर त्यांच्या सोबत अशोक पावडे आणि मंदार देशपांडे यांनी सन्मान सोहळ्यातील संघटनाची उद्घोषणा केली. संगीत मैफिलीचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत वाडीभस्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शैलेंद्र कराळे यांनी मानले.