'माझ्या मुलाचे चुकले, त्याला कठोर शासन झाले पाहिजे'; आरोपीच्या वडीलांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 04:02 AM2020-02-05T04:02:15+5:302020-02-05T06:55:23+5:30
विकेशने बारावीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. नुकताच तो रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता.
हिंगणघाट (वर्धा) : माझ्या मुलाने त्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असेल, तर हे चुकीचेच असून या प्रकाराचे मी व माझे कुटुंबीय कदापि समर्थन करणार नाही. त्याला कठोर शासन झाले पाहिजे, अशा शब्दांत आरोपी विकेश नगराळेचे वडील ज्ञानेश्वर नगराळे यांनी लोकमतशी बोलताना घटनेबाबत संताप व्यक्त केला.
गतवर्षी त्याचे लग्न झाले. १२ दिवसांपूर्वीच त्याला मुलगी झाली असताना हा प्रकार करायला नको होता, असे ते म्हणाले. नगराळे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. एक मुलगी व विवेकचे लग्न झाले. लहान मुलगी परिचारिका आहे. ज्ञानेश्वर हे हृदयरुग्ण आहेत.
विकेशने बारावीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. नुकताच तो रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता.माझा भाऊ कधीच कोणत्याच बाबतीत परिणामांचा विचार करीत नसे. आता त्याने सगळे होत्याचे नव्हते करून ठेवले, अशी व्यथा लहान बहिणीने मांडली. परंतु या सगळ्या घटनाक्रमात आमची काहीही चूक नाही.
बऱ्याच दिवसांपासून आरोपी देत होता त्रास
विकेश त्रास देत असल्याने अनेक महिन्यांपासून प्राध्यापिका युवतीने त्याच्याशी संपर्क तोडले होते. तरीही तो त्रास देत असल्याने युवतीच्या पित्यानेही त्याला समज दिली होती. मागील काही दिवसांपासून विकेशचा त्रास वाढला होता. परंतु युवती व तिच्या कुटुंबीयांनी बदनामी टाळण्याच्या उद्देशाने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही किंवा त्यांची मदतही घेतली नाही.
पेटलेला टेंभा हातात घेतलेला होता...
घटनेचे साक्षीदार असलेल्या विजय कुकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुलाला सकाळी डॉ. आंबेडकर शाळेत सोडून नंदोरी मार्गाने घराकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. एक तरुण रस्त्यावर आडवी गाडी लावून पेटलेला टेंभा हातात घेऊन कुणाची तरी वाट पाहत असलेला आपल्याला दिसला. त्याच्या एका बाजूला एक प्लास्टिकची बाटली ठेवलेली होती. त्याच्या समोरून एकामागे एक दोन तरुणी चालत होत्या. त्या तरुणीला ओलांडून तो पुढे आला व क्षणार्धात एका मुलीची किंकाळी ऐकू आली. त्या पेटत्या मुलीला इतरांनी मदत करून दवाखान्यात दाखल केले.
अकरा व्यक्तींचे जबाब
हिंगणघाटपोलिसांनी अकरा व्यक्तींचे जबाब नोंदविले आहेत. यात काही प्रत्यक्षदर्र्शींचा समावेश आहे. पीडित प्राध्यापिका शेतकरी कुटुंबातील पीडित प्राध्यापिकेचे कुटुंबीय शेतकरी आहे. पीडित तरूणी शाळेत अत्यंत हुशार होती. तिचे प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर तिने हिंगणघाट महाविद्यालयात विज्ञान शाखेत १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पदवी शिक्षण व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिला हिंगणघाट येथील खासगी महाविद्यालयात कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. पीडित तरूणीचे वडील शेतकरी असले तरी त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे कायम लक्ष दिले. तिचा भाऊ अभियांत्रिकी शाखेत जळगाव येथे शिक्षण घेत आहे. विकेश इलेक्ट्रीशियनचे काम करण्यासाठी हिंगणघाटला यायचा. तो सुद्धा बसनेच येत असे. त्यामुळे दोघांचा परिचय होता.