भारतीच्या हत्येचे रहस्य गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:49 PM2018-09-16T23:49:29+5:302018-09-16T23:50:02+5:30
पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा / पुलगाव : पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले नाही. आतापर्यंत पुलगाव पोलिसांनी सुमारे पाच जणांना ताब्यात घेत विचारपूस केल्याचे सांगण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, भारतीला घरी एकटी असल्याचे हेरून आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून तिला धारदार शस्त्रासह जड वस्तूने मारहाण करून तिची हत्या केली. या प्रकरणी पुलगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच पुलगाव पोलिसांच्या दोन तर स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अशा एकूण चार चमू आरोपीच्या शोधार्थ रवाना झाल्या आहेत. जसजशी माहिती पोलिसांना मिळत आले तसतसे काहींना ताब्यात घेत पोलीस त्यांना विचारपूस सध्या करीत आहेत. घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या ठसे तज्ज्ञ चमू व श्वान पथकाला आरोपी हुडकुन काढण्यासाठी पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात येते.
मृतक भारतीचा पती धीरज हा रेल्वे पार्सल विभागात पॉईटमेन पदावर कार्यरत आहे. तर मृतक भारती ही ब्युटी पार्लर व पिको सेंटर चालवित होती. घटनेच्या दिवशी आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्यापूर्वी मृतकाच्या घरातच टपात असलेल्या पाण्याचा वापर पुरावे नष्ट करण्यासाठी केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मारेकºयाने भारतीला मारहाण करताना कुठलीही दया दाखविली नाही. मृतक भारतीच्या शरीरावर चक्क ९० जखमा आरोपीने केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तर घटनेचा दुसरा दिवस असलेल्या रविवारी पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली.
पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे करीत आहेत. लवकरच मृतक भारती जांभूळकर हिच्या मारेकऱ्याला अटक करण्यात येईल, असा ठाम विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
रेल्वे वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप
मृतक भारती जांभूळकर हिचे शवविच्छेदन रविवारी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मृतकाच्या घराच्या आवारात दंगल नियंत्रण पथकासह पोलीस शिपाई तैनात करण्यात आल्याने रेल्वे वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
मारेकºयाचा उद्देश चोरीचा नव्हेच?
मृतक भारतीचा मारेकरी हूडकून काढण्यासाठी पुलगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सध्या जीवाचे रान करीत आहेत. असे असले तरी अद्यापही भारतीचा मारेकरी पोलिसांना गवसलेला नाही. मृतकाच्या हातातील अंगठीसह घरातील इतर मौल्यवान साहित्याला भारतीच्या मारेकºयाने हात लावला नाही. त्यामुळे मारेकरी हा चोरी करण्याच्या उद्देशाने तर नक्कीच भारतीच्या घरात आला नव्हता असा कयास सध्या पोलिसांकडून वर्तविला जात आहे.