नाचणगावच्या सरपंचावर गुन्हा दाखल
By Admin | Published: April 2, 2016 02:45 AM2016-04-02T02:45:35+5:302016-04-02T02:45:35+5:30
नाचणगावच्या सरपंच सुनिता संजय जुनघरे यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायत निवडणूक लढविली.
प्रकरण : निवडणुकीत बनावट दाखल्याचा वापर
पुलगाव : नाचणगावच्या सरपंच सुनिता संजय जुनघरे यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायत निवडणूक लढविली. यात विजयी होवून त्या सरपंच झाल्या. मात्र माहिती अधिकारात त्यांनी सादर केलेला दाखला बनावट असल्याचे समोर आले. यामुळे तक्रारीवरून सरपंचासह त्यांना बनावट दाखला देणारे व शाळेच्या मुख्याध्यापकाची खोटी स्वाक्षरी करणारे त्यांचे पती संजय जुनघरे यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घोडेस्वार यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविल्याने हा बनवाबनविचा प्रकार उघडकीस आला. जि.प.प्राथमिक शाळा आपटी येथील मुख्याध्यापक क्रिष्णा महादेव झाडे यांनी या प्रकरणाची शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच पोलिसातील तक्रारीनुसार सरपंच सुनिता जुनघरे व जि.प. प्राथमिक शाळा आपटी येथील शिक्षक संजय जुनघरे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षक संजय जुनघरे यांनी मुख्याध्यापकाची बनावट स्वाक्षरी करून सुनीता जुनघरे (सुनीता ज्ञानेश्वर मून) शाळेत शिकली नसतानाही शाळा सोडल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्राच्या आधारे सुनिता जुनघरे यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ग्रामपंचायत निवडणूक लढविली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी या पतीपत्नी विरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे नाचणगाव राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. शहर व नाचणगाव वासियांचे लक्ष असलेल्या या प्रकरणी ठाणेदार राजेंद्र शिरतोडे तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)