तरोडाच्या ओसाड जमीनीला नेसविला हिरवा शालू, वर्षभ-यातच रोपट्यांनी गाठली सहा फुटाची उंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:28 PM2017-09-11T18:28:54+5:302017-09-11T18:29:33+5:30
वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे.
वर्धा, दि. 11 - वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे. गत वर्षी तरोडा येथील ओसाड जमीनीची निवड करून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात आली होती. सदर वृक्षांची वेळोवेळी योग्य निगा घेण्यात आल्याने सध्या या रोपट्यांनी सहा फुटाच्यावर उंची गाठली असून एकूणच या उपक्रमामुळे तरोडाच्या ओसाड जमीनीला हिरवा शालू नेसविण्यात वर्धा वन विभागाला यश आल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
गत वर्षी वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने शासनाने दिलेल्या वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता खासदार दत्तक ग्राम असलेल्या मौजा तरोडा येथील सर्वे क्रमांक ११/२, ५६ या २४ हेक्टर ओसाड जमीनीची निवड केली. सदर ओसाड जमीनीवर गत वर्षी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेत श्रमदान करून तेथे मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींची एकूण २७ हजार ५०० रोपटी लावली. केवळ रोपटे लावून संबंधीत कर्मचारी व अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी लावलेल्या रोपट्यांची वेळोवेळी निगाही घेतली. परिणामी, सदर एक वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी सध्या सहा फुटाच्यावर उंची गाठली आहे. पूर्वी हा भाग वृक्षाविना ओसाड होता. परंतु, वनविभागाच्या या उपक्रमामुळे सध्या हा परिसर हरितमय झाला आहे. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच परिसरात अधीक ५ हजार रोपटी लावण्यात आल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
अधिका-यांनी केली पाहणी...
मौजा तरोडा येथील ओसाड जमीनीला वनविभागाने हरितमय केले आहे. तेथील रोपट्यांची सध्याची स्थित, त्यांना वेळीच खत व पाणी दिल्या जाते काय याची पाहणी नुकतीच वन विभागाच्या अधिकाºयांनी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक एस. आर. परटक्के, बीट रक्षक विलास पोहेकर आदींची उपस्थिती होती.
२७ हजार ५०० वृक्ष उत्तम स्थितीत...
मौजा तरोडा येथे गत वर्षी लावण्यात आलेली काही रोपटे विविध कारणांमुळे करपली तर काही रोपटी पुर्णत: वाळून गेल्याने त्यांच्या जागेवर यंदाच्या वर्षी नव्याने ५ हजार रोपटी लावण्यात आली आहे. सध्या हिरव्यागार झालेल्या तरोडा येथील या जमीनीवर साग, आवळा, बांबु, खैर, चिंच, पापडा, बेघड, कडुनिंब आदी प्रजातींची २७ हजार ५०० रोपटी उत्तम स्थितीत असल्याचे सांगण्यात आले.