नगर पंचायतने केली तहसीलची सफाई
By admin | Published: September 3, 2015 01:52 AM2015-09-03T01:52:16+5:302015-09-03T01:52:16+5:30
येथील ‘तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाची झोप उडाली.
आष्टीकर त्रस्त : तहसीलदाराच्या अजब कारभाराने नाराजीचा सूर
आष्टी (शहीद) : येथील ‘तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाची झोप उडाली. बुधवारी चक्क नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून तहसील कार्यालयाची साफसफाई करुन घेतली. तहसीलदार सीमा गजभिये या नगर पंचायतच्या प्रशासक आहे.
तहसील कार्यालयामध्ये धूम्रपान केला जातो. स्वच्छतागृहात दुर्गंधी पसरली होती. मात्र याकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच तहसील प्रशासन खळबडून जागे झाले. तहसीलदार गजभिये नगर पंचायतीच्या प्रशासकपदाच्या नावावर नगरपंचायतच्या दहा-बारा कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात साफसफाईच्या कामाला लावले. आज सकाळी १० वाजता सफाई सुरू झाली. यावेळी सफाई कर्मचारी आपणावर अन्याय होत असल्याची कुजबुज करीत होते.
तहसील कार्यालयाचे कामकाज स्वतंत्र आहे. याची यंत्रणा वेगळी आहे. त्यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप होत आहे. त्यांच्या बोलण्याची पध्दत धमकीवजा इशाऱ्याची असल्याने अवघ्या महिनाभरातच आष्टीवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. तहसील व नगरपंचायत या दोन्हीचा कारभार स्वतंत्र ठेवावा यासाठी समन्वय साधण्याची भूमिका आवश्यक आहे. नगर पंचायतचे प्रशासकपद असल्यामुळे येथील कर्मचारी तहसील कार्यालयात राबविल्याबाबत सवालही उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)