पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 05:47 PM2022-06-02T17:47:13+5:302022-06-02T17:48:45+5:30

आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली.

nagar panchayat employee murdered over money dispute in wardha, dead body and bike found in a well after seven days | पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा

पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा

Next
ठळक मुद्दे आर्वीतील घटनेने उडाली खळबळ : चार आरोपींना ठोकल्या बेड्या

देऊरवाडा (आर्वी) : सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह एका शेतातील विहिरीत पुरवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती बुधवार ३१ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उजेडात आली. मृतकाच्या शरीरावरील दागिने चोरुन गळा आवळून हत्या करीत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याच्या घटनेने मात्र, आर्वी शहरात चांगलीच खळबळ उडाली.

महेंद्र रामराव शिंगाणे (५९) रा. नेताजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी अक्षय रमेश सतपाळ (२३), शेख शाहरुख शेख रउफ (२८), विनोद दयाराम कुथे (४२), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (२९) सर्व रा. आर्वी यांना मध्यरात्रीच्या सुमारास अटक केल्याची माहिती आहे.

मृतक महेंद्र हा कुणालाही न सांगता त्याच्या एम.एच. ३२ एक्यू. ७९९४ क्रमांकाच्या दुचाकीने घरातून बाहेर गेला होता. मात्र, तो परतलाच नाही. याबाबत पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाला गती दिली. आरोपींसोबत मृतकाचा पैशाचा व्यवहार असल्याने आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार मुलगा सागर शिंगाणे याने पोलिसात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बाेलाविले. तेथे महेंद्रचा दोराने गळा आवळून त्याची हत्या करीत पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे २ गोफ, आणि रोख रक्कम काढून घेत त्याचा मृतदेह आणि दुचाकी विहिरीत पुरवून पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलिसांना दिली.

आर्वी पोलिसांनी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास अनिल अर्जुन ठाकरे यांचे शेत गाठून विहिरीत पुरलेली दुचाकी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मध्यरात्रीच चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे यांच्या निर्देशात पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

मृतक महेंद्र राहयचा कुटुंबापासून विभक्त

महेंद्र शिंगाणे हा नगरपालिका कार्यालयात सफाई जमादार म्हणून कार्यरत होता. तो नेताजी वॉर्डात वास्तव्य करीत होता. त्याने त्याचे घर फईमभाई यांना भाड्याने दिले होते. महेंद्र याला विविध प्रकारचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि मुलासह त्याचा नेहमीच वाद होत असे. याच कारणातून पत्नी व मुलाने सहा महिन्यापूर्वी नेताजी वॉर्डातील घर सोडून ते दोघे राधाकृष्ण नगरीत राहायला गेले होते. त्यामुळे महेंद्र शिंगाणे हा कुटुंबापासून विभक्त राहत होता.

सर्वत्र शोध पण कानी पडली धक्कादायक माहिती

मृतक महेंद्र हा एकटाच राहत होता. तो नेहमी गरजूंना मदत लागल्यास त्यांना आर्थिक मदतही करायचा. २५ रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद दाखवत होता. भाडेकरुंनी घरी कुलूप असल्याचे सांगितले. आपले वडील अक्कलकोटला गेले असावे, असा अंदाज मुलगा सागर याने लावला. त्यामुळे अन्सार भाई, गौरव जाजू, संदीप शिंगणे, संजू भाई, दिनेश गुप्ता, बालू वानखडे यांनी महेंद्रचा सर्वत्र शोध घेतला. अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास महेंद्रचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती कानी पडताच घरच्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

असा झाला हत्येचा उलगडा...

मृतक महेंद्र हा २५ मे रोजीपासून बेपत्ता होता. त्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करुन महेंद्रच्या मोबाईलची माहिती काढली. त्यानुसार सुमित जाधव याच्या मोबाईलवरून शेवटचा कॉल आल्याची माहिती मिळाली आणि तो आरोपी अक्षय सपकाळ आणि शाहरुख शेख याच्या संपर्कात असल्याचे समजले. महेंद्रच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यात पैशाचा व्यवहार होत होता, याच वादातून आरोपींनी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षयला ताब्यात घेत चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आणि हत्येच्या घटनेचा उलगडा झाला.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी रात्रीच घेतली धाव

आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. याची माहिती वरिष्ठांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी आर्वी गाठून घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: nagar panchayat employee murdered over money dispute in wardha, dead body and bike found in a well after seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.