दिवसपाळीत नागपूर ते मुंबई नवीन शताब्दी एक्स्प्रेस द्या
By Admin | Published: May 8, 2016 02:24 AM2016-05-08T02:24:07+5:302016-05-08T02:24:07+5:30
नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवासी रेल्वेची संख्या नगण्य असून प्रवाश्यांना पुर्णपणे रात्रकालीन प्रवाशी रेल्वेवर अवलंबून राहावे लागते.
रामदास तडस यांचा लोकसभेत अतारांकित प्रश्न
वर्धा : नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवासी रेल्वेची संख्या नगण्य असून प्रवाश्यांना पुर्णपणे रात्रकालीन प्रवाशी रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. विदर्भातील या समस्येवर लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्न उपस्थित करून नागपूर ते मुंबई पर्यंत शताब्दी एक्स्प्रेम सुरू करावी, अशी मागणी केल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी केल्याचे त्यांनी कळविले आहे.
या संदर्भात नागरिकांनी व रेल्वे संघटनांनी नागपूर वरून मुंबईकरिता दिवसकालीन रेल्वे सुरू करण्याबाबत अनेक वेळा मागणी केलेली होती. नागपूर येथून आजपर्यंत मुंबईकरिता कुठल्याच प्रकारची दिवसकालीन प्रवासी रेल्वे सेवा अस्तित्वात नाही. एकही गाडी नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजास्तव रात्रीतून प्रवास करून मुंबईला जावे लागते. शताब्दी एक्स्प्रेस सेवा भारतीय रेल्वेमध्ये अतीशय महत्त्वाची कामगिरी बजावत असून या सेवेद्वारे पुणे-हैदराबाद, दिल्ली-भोपाल, दिल्ली-कालका, दिल्ली-चंदीगड, मुबई-अहमदाबाद, दिल्ली-कानपूर या सह इत्यादी प्रमुख शहरे जोडलेली आहे. या सेवेचा मुंबई-नागपूर मार्गाकरिता लाभ व्हावा या दृष्टीकोनातून याबाब संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी कळविले आहे. या विषयावर खा. तडस यांनी ना. सिन्हा यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर ना. सिन्हा यांनी सकारात्मक उत्तर देत नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवाशी गाडी देण्याचे आश्वासीत केल्याचे खासदारांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)
रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितली तांत्रिक अडचण
खा. रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, नागपूर-मुंबई शताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत यापूर्वी रेल्वे बोर्ड, महाप्रबंधक कार्यालय, विभागीय रेल्वे कार्यालय अनेक निवेदन प्राप्त झाली आहे; परंतु नागपूर-मुंबई दरम्यानचे अंतर ७०० किमी पेक्षा अधिक असल्याने सदर सेवा सुरू करण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे खासदारांना सांगितले.