विश्वशांतीसाठी ‘नागराज’ची सायकलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:31 PM2019-06-05T22:31:41+5:302019-06-05T22:32:07+5:30
ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. येथे दोन दिवस मुक्काम करुन पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर तेलंगणाकडे रवाना होणार आहे.
नागराज गौडा मल्लेगौडा (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील हासन येथील आहे; मुंबईत आल्याने त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून ही सायकल यात्रा ३ डिसेंबर २०१७ ला सुरु केली. पाणी बचाव-हरियाली बचाव, जिओ और जिने दो, गोरक्षा, सनातन, सर्वधर्म समभाव, देशभक्ती विश्वशांती, हेल्थ ईज वेल्थ अशी जनजागृतीकरित नागराज यांनी आपला प्रवास सुरु केला. ते दररोज सायकलने ८० कि.मी.चा प्रवास करतात. त्यांनी मुंबईनंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नागपूर मार्गे वर्ध्यात प्रवेश केला आहे. सेवाग्राम आश्रमात मुक्कामी असून पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर ते तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, झारखंड व बिहार या ठिकाणीही जाणार असल्याचे सांगितले.
ना राहण्याचे नियोजन ना खाण्यापिण्याचे
मुंबई येथून निघालेली नागराज यांची सायकलस्वारी सतत सुरु आहे. कोणत्या गावाला कुठे थांबायचे, कुणाकडे जेवन करायचे याचे काहीही नियोजन नाही. वाटेत जे गाव लागेत त्या गावात थांबायचे मिळेल ते खायचे, असाच यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांना या जगभ्रमंतीमध्ये मंदिर, आश्रम, गुरुव्दारा, आर्य समाज भवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिंचे सहकार्य मिळत आहे.
जगातील शांती नांदावी याकरिता ही सायकलवारी सुरु केली असून आता सेवाग्राम येथून तेलंगणा, कर्नाटकला जाणार. कर्नाटक मुळ गाव असल्याने येथे पावसाच्या दिवसांत दोन महिने मुक्काम करणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरु होईल. प्रवासदरम्यान मार्गावर असलेले मार्ग दाखविणारे फलकच प्रवासाकरिता मार्गदर्शक ठरत आहे. अडचण आल्यास नागरिकांना विचारुन पुढील प्रवास सुरु करतो. या प्रवासात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.
- नागराज गौडा, यात्रेकरू.