‘स्वच्छ’च्या नावाखाली शासनाला लाखोंचा चुना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:47 PM2018-11-21T23:47:44+5:302018-11-21T23:48:59+5:30
स्थानिक नगरपंचायत स्वच्छ शहराच्या दिशेने पाऊल टाकत असली तरी येथील काही कामांचा दिलेला कंत्राट सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने कंत्राटदाराचे भल तर केल्या जात नाही ना असा सवाल शहरातील स्वच्छता प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्थानिक नगरपंचायत स्वच्छ शहराच्या दिशेने पाऊल टाकत असली तरी येथील काही कामांचा दिलेला कंत्राट सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने कंत्राटदाराचे भल तर केल्या जात नाही ना असा सवाल शहरातील स्वच्छता प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायत काही विषय एखादी कर्मचारी नियुक्त करून करू शकत असताना कंत्राटदाराला लाभ मिळेल अस करीत त्यावर मोठा निधी खर्ची केला जात आल्याने या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही गरज निर्माण झाली आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण करून सचखंड फसिलीटी सेंटर, नांदेड यांना कंत्राट देण्यात आला. शिवाय वार्षिक ५६ लाख ६४ हजार ४०० रूपये देण्याचा करार झाला. सदर कंत्राटदाराला नगरपंचायत प्रशासनाला प्रती महिना ४.७२ लाख द्यावे लागतात. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराने ३ मालवाहू उपलब्ध करून देत त्यावर चालकांची नियुक्ती केली. त्यांचे वेतन धरून १२ हजार रूपयांचा हा खर्च आहे. सर्व गोष्टींचा हिशेब केला असता कंत्राटदाला महिन्याचा १.६२ लाखांचा खर्च येतो. परंतु, नगरपंचायत प्रशासनाला कंत्राटदाराला दर महिन्याला ४ लाख ७२ हजार रूपये अदा करावे लागत आहे. या रक्कमेची तफावत लक्षात घेता दर महिन्याला ३ लाख १० हजारांचा नफा कंत्राटदाराला होत आहे. त्यामुळे सुजान नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
शहरात १७ वॉर्ड
शहरात एकूण १७ वॉर्ड आहे. या वॉर्डात एका मजुराची नियुक्ती करून त्याच्याकडून साफसफाई करून नगरपंचायतच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास हे काम केवळ २ लाखामध्ये पूर्ण केले जाऊ शकते, असे जानकार सांगतात. परंतु, सध्या नगरपंचायत प्रशासन कुणाचे हित जोपासत आहे हेच कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे कार्यवाहीची मागणी आहे.
स्वच्छता अभियानच्या नावावर हा लाखो रूपयाचा कंत्राटदाराला फायदा मिळवून दिल्या जात आहे. हा प्रकार नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. २ लाखात प्रत्येक महिन्यात शहरातील १७ वॉर्ड स्वच्छ होऊ शकतात. परंतु, महिन्याला कंत्राटदाराला ४ लाख ७२ हजार रूपये दिले जात आहे. हे उलघडणारे कोडे आहे. यावर सर्व सदस्यांनी विचार करून शासकीय निधीची होणारी उधडपट्टी थांबवावी.
- मधुकर कामडी, विरोधी पक्ष नेता, नगरपंचायत, समुद्रपूर.