वर्धा रेल्वे स्थानकाला राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:42 PM2018-04-05T22:42:19+5:302018-04-05T22:42:19+5:30
वर्धा जिल्ह्याची देशपातळीवर गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. महात्मा गांधी वर्धेतील सेवाग्राम आश्रमातून अनेक आंदोलनांचे बिगुल फुंकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : वर्धा जिल्ह्याची देशपातळीवर गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. महात्मा गांधी वर्धेतील सेवाग्राम आश्रमातून अनेक आंदोलनांचे बिगुल फुंकले. यासाठी वर्धा रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जा मिळण्यासोबतच त्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नावे देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे सादर झाला आहे. आपण त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा ठाम विश्वास खा. रामदास तडस यांनी ‘लोकमत’शी केलेल्या अनौपचारिक चर्चेतून व्यक्त केला.
स्वच्छ भारत सुंदर भारत मोहिमेंतर्गत वर्धा रेल्वे स्थानक राष्ट्रीय पातळीवर अग्रणी आहे. वर्धा रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक रेल्वेस्थानक होणार आहे. बापूंची कर्मभूमी असलेल्या वर्धा रेल्वे स्थानकाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण लोकसभेत मांडणार आहो. त्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता रेल्वे मंत्रालयाकडे करणार असल्याचेही खा. तडस म्हणाले. वर्धा रेल्वे स्थानकाला बापूंचे नाव मिळाल्यामुळे गांधी जिल्ह्याचे नाव जागतिक नाकाशावर झळकणार असून या स्थानकाच्या नविनीकरणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात येत आहे. वर्धा रेल्वे स्थानकाचे नाव व दर्जा बदलण्यामुळे प्रवाशांच्या सुखसोईतही भर पडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज करणार
बंद पडलेल्या पुलगाव-आर्वी मीटरगेज लाईनचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करून ती आमला रेल्वे स्थानकापर्यंत वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्र शासन आवश्यक निधीही उपलब्ध करून देणार आहे. याबाबत दोनदा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असून भाजपा शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. हा मार्ग सुरू झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.