वर्धेत १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले

By admin | Published: August 17, 2016 12:45 AM2016-08-17T00:45:34+5:302016-08-17T00:45:34+5:30

शहराच्या मध्यभागी असलेल्या आयुष पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरून

Named petrol and cigarettes worth Rs | वर्धेत १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले

वर्धेत १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले

Next

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : व्यवस्थापनाला धरले वेठीस
वर्धा : शहराच्या मध्यभागी असलेल्या आयुष पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरून संतप्त नागरिकांनी मंगळवारी पेट्रोलपंप व्यवस्थापनाला सुमारे तीन तास वेठीस धरले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोल पंपाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. यामध्ये दंगा नियंत्रण पथक, मार्शल पथकासह दोन ठाणेदार, चार पोलीस उपनिरीक्षक व शिपायांचा ताफा घटनास्थळावर नियंत्रण ठेवले.
किशोर देशमुख यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. ते सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास आपले वाहन ढकलत आयुष पेट्रोल पंपवर पोहोचले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला १०० रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकायला सांगितले. पेट्रोल टाकल्यानंतर त्यांना कमी पेट्रोल टाकल्याचा संशय आला. यानंतर वाहन बाजूला उभे करून एका दुकानातून पाण्याची शिशी विकत घेतली. त्यातील पाणी फेकून दिले आणि त्या शिशीत वाहनात टाकलेले पेट्रोल काढले असता अत्यल्प पेट्रोल निघाले. आपली शुद्ध फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच त्यांचा माथा फिरला. त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता त्याच्याकडे उद्धटपणे उत्तरे मिळालीत. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे लक्षात घेऊन तेथे असलेल्या काही वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी पेट्रोलपंपकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. बघता-बघता शेकडोंचा संतप्त जमाव पेट्रोलपंपवर चालून गेला.
ही वार्ता शहरात पसरताच अनेकजण घटनास्थळ गाठून पेट्रोलपंप मालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात खडसावू लागले. गर्दी वाढतच होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळातच शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, रामनगरचे ठाणेदार विजय मगर, पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके, पपीन रामटेके, सतीश खेडेकर, संजय खोंडे हे पोलीस ताफ्यासह दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दंगल नियंत्रक पथक व मार्शल पथकाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार जी.सी. बर्वे व पुरवठा निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन लेखी स्वरुपात तक्रार लिहून घेतली. यावेळी वजन मापन विभागाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी किशोर देशमुख या ग्राहकाला लेखी तक्रार मागितली होती; पण अद्याप तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक शिरतोडे यांनी सांगितले. शहर ठाण्याशी संपर्क साधला असता स्टेशन डायरीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)

 

Web Title: Named petrol and cigarettes worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.