‘त्या’ भूखंडांवर भलतीच नावे
By admin | Published: September 10, 2016 12:31 AM2016-09-10T00:31:35+5:302016-09-10T00:31:35+5:30
प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे.
प्रशासनाचा गलथानपणा : नावे कमी करण्यासाठी महिलेचा खटाटोप
वर्धा : प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. भूखंडावर त्या भूखंड मालकाचे नाव असताना त्यावर पुन्हा नावाची नोंद झाली आहे. वास्तविक, ती व्यक्त कोण, कुठे राहते, याचा काहीही थांगपत्ता नाही, हे विशेष. आता हे नाव कमी करण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.
मौजा आलोडी येथे श्रीकांत भुरे यांच्या नावाने सर्व्हे क्र. ४८ मध्ये १, २, ३, २३ व ३४ अनुक्रमे आराजी क्षेत्र १६९.६४ व उर्वरित सर्व १८५.७८ चौ.मी. आहे. भूखंड मालक राजेंद्र भुरे यांचा २४ एप्रिल २०१६ रोजी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या वारसानाची नोंद करण्यासाठी त्यांची पत्नी विणा राजेंद्र भुरे यांनी नालवाडी तलाठी कार्यालयातून सातबारा मिळविला असता त्यातील भूखंड क्र. १, २ व ३ च्या सातबारावरून राजेंद्र भुरे यांचे नाव कमी केलेले आहे. भूखंड क्र. १ वर मिलिंद अजाब बोकडे, भूखंड क्र. २ वर नरेश अजाबराव कडू व भूखंड क्र. ३ वर राजेश नागोराव रोकडे यांच्या नावाची नोंद असल्याचे दिसून आले. उर्वरित भूखंडांवर मात्र राजेंद्र भुरे यांचे नाव कायम आहे.
वास्तविक, भूखंड क्र. १, २ व ३ सदर व्यक्तींना विकले वा बक्षिसपत्र, वाटणी व दानपत्र करून दिलेले नाही. याबाबत वर्धा, देवळी व पुलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही असे व्यवहार झाल्याची नोंद नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सातबारा मधील फेरफार क्र. ४०४४, ३५३७ व ८७९० या पंजीमध्येही सदर व्यक्तींच्या नावाची नोंद नसताना सदर भूखंडांवर बोगस व्यक्ती व खोट्या नावाची नोंद कशी झाली, हे न उलगडणारे कोडेच आहे.
प्रशासनाचा गलभानपणामुळे त्रस्त होऊन सदर बोगस नावे कमी करण्यासाठी राजेंद्र भुरे यांच्या पत्नी विणा भुरे या संबंधित विभागात चकरा मारत आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)