दोन टक्क्यात अडकले ‘नम्मा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:33 PM2018-01-20T23:33:51+5:302018-01-20T23:34:06+5:30
स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. याला महिना लोटला तरी कंत्राटदाराने नगर परिषदेला अदा करावयाची एकूण कामाची २ टक्के रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने या हे टॉयलेट अडकले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ हा उपक्रम लक्षात घेत स्वच्छ व सुंदर वर्धेच्या दिशेने सध्या वर्धा नगर पालिकेची वाटचाल सुरू आहे. शहरातील काही गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहच नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. महिलांसह पुरुषांना योग्य सोयी-सुविधा देण्यासाठी वर्धा शहरातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी नम्मा टॉयलेल लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यात कंत्राटदाराची निवडही झाली आहे. सदर कामाचा कंत्राट अर्बन इंडस्ट्रीज लि. चेन्नई तामिळनाडु यांना देण्यात आला आहे. शहरात लवकरात लवकर नम्मा टॉयलेट लागावेत म्हणून वर्धा न.प. प्रशासनाने या कंत्राटदाराला ४ डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार एकूण कामाच्या २ टक्के रक्कम तात्काळ भरण्यात यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याबाबतची माहिती ई-मेलद्वारे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिली; पण महिना लोटूनही कंत्राटदाराने सदर रक्कम नगर परिषदेला अदा केली नाही. परिणामी, नगर पालिकेच्या अडचणीत भर पडल्याचे बोलले जात आहे.
सदर स्वच्छतागृह स्वच्छ वर्धेसाठी फायद्याचे ठरणार आहे. यामुळे नम्मा टॉयलेट शहरात लवकरात लवकर कसे लावता येतील, यासाठी पालिका प्रशासन, न.प. लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाºयांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
९० दिवसांत स्वच्छतागृह लावणे क्रमप्राप्त
अंदाजपत्रकानुसार कंत्राटदाराने काम करणे गरजेचे असून काम सुरू करण्यापूर्वी न.प. अभियंत्याकडून कामाचे मार्कआऊट करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय कंत्राटदाराने आदेशापासून ९० दिवसांत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
या पाच ठिकाणांची निवड
शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आर्वी नाका परिसर तथा बडे चौक परिसरात ६० लाख १९ हजार ८४० रुपये खर्च करून नम्मा टॉयलेट लावण्यात येणार आहेत.