राजस्थानच्या चोरट्यांचा वर्धेत डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:43 PM2018-02-23T23:43:07+5:302018-02-23T23:43:07+5:30
येथील बोरगाव (मेघे) परिसरात घरफोडी करून दागिने लांबविणाऱ्या राजस्थान येथील चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : येथील बोरगाव (मेघे) परिसरात घरफोडी करून दागिने लांबविणाऱ्या राजस्थान येथील चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात चोरट्यांकडून ८९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. शंकर रामगोपाल बागरीया (१८) रा. बडली ता. बनाई व ओमप्रकाश छोटुराम बागरिया (२२) रा. मोटाळा ता.सावर जि. अजमेर (राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, गणेश नगर येथील ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरी २२ जानेवारी २०१८ रोजी चोरी झाली. याची तक्रार शहर ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीत चोट्यांनी एकूण १.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात आले. यावरून गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शंकर रामगोपाल बागरीया व ओमप्रकाश छोटुराम बागरिया या दोघांना अजमेर गाठत अटक केली. या दोघांनी पोलीस कोठडी दरम्यान चोरीची कबुली दिली. शिवाय अजमेर जिल्ह्यात विकलेले ८९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या चोरट्यांकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून तपास सुरू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले तसेच नापोका सचिन दवाळे, दिनेश तुमाने, जगदीश चव्हाण, विशाल बंगाले यांनी केली.
साथीदारांचा शोध सुरू
पोलिसांनी अटक केलेले दोन्ही चोरटे राजस्थान येथील असल्याचे समोर आले. या दोघांसोबत त्यांचे इतर सहकारी शहरात तर नाही ना याचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.