नांदगाव ग्रा.पं.त भोंगळ कारभार
By Admin | Published: January 5, 2017 12:43 AM2017-01-05T00:43:26+5:302017-01-05T00:43:26+5:30
नजीकच्या नांदगाव (कानगाव) ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठल्याचा आरोप होत असून कारवाईबाबत संबंधिताना निवेदने देण्यात आली.
सीईओंचे तक्रारींकडे दुर्लक्ष : ग्रामसभा घेतल्याचा बनाव करीत असल्याचा आरोप
वायगाव(नि.) : नजीकच्या नांदगाव (कानगाव) ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठल्याचा आरोप होत असून कारवाईबाबत संबंधिताना निवेदने देण्यात आली. परंतु, त्याकडे संबंधीतही दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव (का.) ग्रा.पं.मधील गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
नांदगाव (का.) ग्रा.पं.त जून २०१६ पासून अद्याप मासिक सभा घेण्यात आली नाही. ग्रा.पं. सचिव व सरपंच आपल्या मनमर्जीप्रमाणे कामे करीत असून अनेक ठिकाणी विनाकारण खर्च करीत आहेत. त्याचा हिशोब उपसरपंच व सदस्यांना दाखवण्यात आला नसल्याचा आरोप उपसरपंच शंकर वाघमारे व सदस्य सतीश ठाकरे आदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सरपंच व सचिव यांनी अद्याप ग्रामसभाही घेतली नाही. वॉर्ड १ मधील अतिक्रमण काढण्याचे आदेश वरिष्ठांनी परिपत्रकाद्वारे दिले. मात्र, सचिव म्हैसकर यांनी सरपंचासोबतचे संबंध जोपासत अतिक्रमण काढण्यासाठी अद्याप कुठलेही कार्यवाही केली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना २० सप्टेंबर २०१५, ३० आॅक्टोबर २०१५, ३० जून २०१६, १ आॅगस्ट २०१६, २८ आॅगस्ट २०१६, ८ सप्टेंबर २०१६, १६ आॅक्टोबर २०१६, ५ डिसेंबर २०१६ आदी वेळा तक्रारी करीत चौकशीची मागणी केली. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आदींना निवेदन देऊन माहिती देण्यात आली. परंतु, अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
नांदगाव (का.) ग्रा.पं. मध्ये मासिक सभा जून महिन्यापासून घेण्यात आली नाही. सरपंच व सचिव सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करीत आहेत. ते विविध कामांचा विकास निधी आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. सदर प्रकारामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत चौकशी होणे क्रमप्राप्त असून तात्काळ संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच महिन्यांपासून ग्रामसभा घेण्यात आली नाही. परंतु, अनेक नोटीस ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर चिकटविण्यात आले आहे. सदर नोटीसच्या माध्यमातून ग्रामसभा झाल्याचे दर्शविण्यात येत असून सदर प्रकार ग्रामपंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची दिशाभूल करणारा असल्याने सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)