नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे नाही; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:26 AM2019-05-21T11:26:11+5:302019-05-21T11:26:33+5:30

नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले.

Naphed does not pay money; Farmers in trouble | नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे नाही; शेतकरी अडचणीत

नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे नाही; शेतकरी अडचणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा  : नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले. चाळणीतून पडलेल्या बारीक तुरी मातीमोल भावाने विकण्याची पाळी तुर उत्पादकांवर आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला तर त्याचा चुकारा ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांना द्यावा, असा शासनाचा दंडक नव्हे, स्पष्ट नियम आहे. खासगी व्यापाऱ्यांनी तो पाळावा, अशी त्यांच्यावर सक्ती असते. मात्र शासनाकडूनच वर्षानुवर्षापासून नियम पायदळी तुडविला जात आहे. गतवर्षी शासनाने नाफेड या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या तुरी खरेदी केल्या. त्याचे पैसे सहा महिन्यांपर्यंत दिले नाही. मागीलवर्षी खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने शासनाला मोठ्या प्रमाणात तुरी खरेदी कराव्या लागल्या. त्यामुळे चुकारे विलंबाने मिळालेत. हे अन्यायकारी असले तरी समजण्यासारखे होते. यावेळी मात्र दुष्काळाच्या निकषावर शासनाने केवळ एकरी अडीच क्विंटल एवढ्या कमी तुरी घेतल्या. खुल्या बाजारात लवकरच तुरीचे भाव हमीभावाच्या आसपास आल्याने शिवाय चाळणीच्या जाचक अटीमुळे अनेक तूर उत्पादकांनी शासनाला तुरी विकण्यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना विकून आर्थिक अडचण भागविली. ज्यांनी आपल्या तुरी नाफेडला विकल्या, त्यांना चुकारा न मिळाल्याने त्यांची मात्र आर्थिक अडचण कायम आहे. खुल्या बाजारात भाव सहा हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल पाचशेच्यावर नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर आणूच नये ही नकारात्मकता केंद्रावरील अधिकाऱ्यांनी जोपासल्याने चाळणीतून जास्तीत जास्त तुरी खाली कशा पडतील, अशा हमालांना गुप्त सूचना दिल्याने चाळणीतून पडलेल्या तुरी अनेक शेतकऱ्यांनी तेथेच खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने विकाव्या लागल्या. कित्येक शेतकऱ्यांना तुरी जनावरांना खाऊ घालाव्या लागल्या. एवढ्या कमी प्रमाणात व दर्जेदार तुरी खरेदी केल्यावर दोन-दोन महिने चुकारे मिळू नये, ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. चुकारे मिळतील, तेव्हा विलंबाच्या कालावधीचे व्याज देणार नाही, ही बाब तूर उत्पादकांवर अन्याय करणारी आहे. एकंदरीत शेतकऱ्यांवर अन्याय करताना कोणतीच कसर ठेवायची नाही, तरीही त्याला जगाचा पोशिंदा म्हणून कोरडी सद्भावना दाखवायची हाच अनुभव असतो, हे मात्र खरे!

२५ मार्च २०१९ ला आर्वी केंद्रावर नाफेडला तुरी विकल्या. अद्याप चुकारा मिळाला नाही. चाळणीमुळेही बऱ्याच तुरी घरी आणाव्या लागल्या, तर आता बाहेरचे भाव वाढल्याने तिहेरी नुकसान झाले.
- बाळा राऊत, शेतकरी रोहणा .

Web Title: Naphed does not pay money; Farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती