वर्ध्यातील एमगिरी परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारणार, नारायण राणे यांची घोषणा
By आनंद इंगोले | Published: October 2, 2022 04:28 PM2022-10-02T16:28:00+5:302022-10-02T16:29:02+5:30
Narayan Rane: महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.
- आनंद इंगोले
वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठे योगदान राहिले असून ग्रामीण स्वयंरोजगाच्या माध्यमातून आर्थिक संमृद्धीलाही चालना दिली. त्याचे हेच विचार घेवून वर्ध्यामध्ये ग्रामीण औद्योगिक प्रगतीचे लक्ष्य आहे. यासाठीच महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.
महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या स्मारक निर्मितीकरिता येत्या सहा महिन्यामध्ये समितीचे गठण करुन येत्या अडीच वर्षात या ३८ एकराच्या परिसरात स्मारक पूर्णत्वास जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून युवा पिढीला गांधींजींच्या ग्रामीण औाद्योगिक प्रगतीसंदर्भातील माहिती, प्रशिक्षण दिली जाईल. येथे येणाºया प्रत्येक पर्यटकांना एक वेगळी अनुभूती या स्मारकातून होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमगिरीतील संचालकाचे पद रिक्त असून ऐत्या एक ते दीड महिन्यात हे पद भरले जाणार असून विदर्भातील व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असेही ना. राणे म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रतापसिंह वर्मा, सूक्ष्म मंत्रालयाचे सचिव बी.बी.स्वैन, सहसचिन आणि अधिकारी आदी उपस्थित होते.
मातोश्रींवर खोके, शिवसैनिकांना खाली पिशव्या!
बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं होत, तेव्हाच ते त्यांना मुख्यमंत्री करु शकले असते. केवळ मुख्यमंत्री पदासाठीच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली आणि गद्दारी करुन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. आतापर्यंत मातोश्रीवर खोके जायचे आणि शिवसैनिकांना मात्र खाली पिशव्या मिळायच्या म्हणूनच शिवसेनेमध्ये ही फु ट पडली आहे. आता ठाकरेची शिवसेना ठासळण्याच्या स्थितीत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली.
इतर पक्ष केवळ औषधाला ठेऊ!
ठाकरेंच्या शिवसेनेला अस्तित्व राहिलं नाही. त्यांच्याकडे जे आमदार आहेत, तेही आता शिंंदे गटात दाखल होतील. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस आहे का? काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? काँग्रेसलाही मायबाप राहिलं नाही, त्यामुळे देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप. इतर पक्ष राहील पण, केवळ औषधापुरते, असेही राणे म्हणाले.