देशी जवस तेलाची लज्जतच न्यारी! वर्धा जिल्ह्यातील गिरड प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:51 PM2019-03-09T14:51:04+5:302019-03-09T14:53:29+5:30

तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे.

Nariyari is the taste of indigenous oil! The famous Girad in Wardha district | देशी जवस तेलाची लज्जतच न्यारी! वर्धा जिल्ह्यातील गिरड प्रसिद्ध

देशी जवस तेलाची लज्जतच न्यारी! वर्धा जिल्ह्यातील गिरड प्रसिद्ध

Next
ठळक मुद्देजवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीविततेल स्वराज्य चळवळीला गती मगन संग्रहालयाचा उपक्रम

सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकेकाळी अन्नधान्याच्या कौटुंबिक गरजा शेतीतून पूर्ण व्हायच्या. बाजारातून गूळ आणि मीठ घेतले की, ग्रामीण जनतेचा प्रपंच चालायचा. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहेत. सध्या खाद्य तेलात होत असणाऱ्या भेसळीमुळे कोणते तेल खावे, याचा प्रत्येकालाच पेच पडला आहे. तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे. गिरड येथे नैसर्गिक शेती विकास केंद्रात तेल उत्पादन केले जात आहे. खाद्यपदार्र्थाच्या चवीतून गेलेली देशी तेलाची गोडी पुन्हा परतल्याने जवस तेलाला पसंती मिळत आहे.
संपूर्ण विदर्भात अन्नधान्याची एकीकाळी समृद्धी होती. मात्र, कालांतराने एकल पीक पद्धतीमुळे मिश्र शेतीचा ºहास झाला असताना पारंपरिक पीकपद्धती टिकवून ठेण्यासाठी मगन संग्रहालय समितीने चळवळ सुरू केली आहे. नामशेष झालेल्या जवसाची लागवड ते तेल उत्पादन करीत बापूंच्या तेल घाणीला तेलस्वराज्य चळवळीतून उभारी दिली आहे.
गिरड येथील मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात ही बापूंची घाणी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जवस लागवडीकडे कल वाढला आहे. जवस उत्पादन ते शुद्ध तेलनिर्मिती प्रक्रियेमुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. यामुळे आता जवस पिकाला ‘अच्छे दिन’ येत आहेत.
जिल्ह्यात पूर्वी जवस पेरा क्षेत्र कमालीचे होते. गावोगावी तेल घाण्या असायच्या. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहे. गेल्या दशकात कृषी विभागाच्या शासकीय अहवालातील तेल बीज व जवस पेºयाचा आकडा शून्य आहे. मात्र, मगन संग्रहालय समितीच्यावतीने जवस बियाणे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आल्याने यावर्षी ४० एकरात जवस पेरणी क्षेत्र आहे.
बाजारातून मिळणाऱ्या तेलात मोठी भेसळ करण्यात येत असल्याने त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. तसा शासकीय आरोग्य यंत्रणेचा अहवाल असला तरी महागाईच्या काळात स्वस्त मिळेल तेच तेल नियमित स्वयंपाकात वापरले जात आहे. याचाच विपरीत परिणाम तेल घाणी व्यवसायावर झाल्याने अखेरची घरघर लागली. मात्र, आता नागरिकांना जवस तेलाचे महत्त्व पटू लागल्याने उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याची माहिती नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

तेल स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून खाद्य तेलाच्या धोरणासंदर्भात सरकारकडे रास्त मागण्या केल्या. ताजे शुद्ध तेल काढणाऱ्या घाण्यावर कुठलेही निर्बंध लावू नये, आरोग्याला घातक विदेशी तेलाच्या आयातीवर बंदी घालावी, तेल विकणाºया बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रतिबंधित करावे, प्रशासनाकडून विदेशी खाद्य तेलापासून मानवी शरीरावर होणारे घातक परिणामाविषयी जनजागृती करावी. विदेशी तेलावर जी.एम. सोयाबीन, बी.टी. सरकीपासून बनलेले तेल असा स्पष्ट उल्लेख करावा, तेलातील भेसळ व त्याचे प्रमाण स्पष्ट पाकिटावर लिहावे, या तेलामुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान नमूद करावी, आदी मागण्यांसंदर्भात शासनाने सजग राहून नागरिकांच्या जीवनाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी केलेली आहे.
डॉ.विभा गुप्ता
अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा

 

 

Web Title: Nariyari is the taste of indigenous oil! The famous Girad in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती