राष्ट्रीय पेयजल; ५८ पैकी ८ कामेच पूर्ण
By Admin | Published: December 29, 2014 01:56 AM2014-12-29T01:56:21+5:302014-12-29T01:56:21+5:30
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...
वर्धा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ५० गावांतील कामे निधी अप्राप्त असल्याने रखडल्याची माहिती पूढे आली आहे़
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत २०१४-१५ मधील जिल्ह्यातील ५८ गावांपैकी केवळ आठच कामे पूर्ण होऊ शकली आहेत़ या कामांकरिता उपलब्ध निधी ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी केवळ ६० टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ५० कामे रखडल्याचेही सांगण्यात आले आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४२६ गावांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता़ यापैकी ३२८ गावांकरिता अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही़ आठ दिवसांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे़ यावरून या वर्षीचा निधी पाठविण्यात आला; परंतु मागील वर्षीचा निधी रोखून धरण्यात आला आहे़ याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिली.
यावर उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी टंचाईचा निधी वेगळाच असतो़ सदर निधी त्वरित मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. टंचाईकरिता तालुकानिहाय आढावा बैठक बोलविण्याबाबत अध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी पत्र पाठविण्याची सूचना शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी केली. शिवाय ज्यावेळी आराखडा मंजूर केला जातो, त्याचवेळी ४० टक्के निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा आणि तो ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात यावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाई संदर्भातील मागणी घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
निधी प्राप्त न झाल्याने आर्वी तालुक्यातील पाचोड, गुमगाव, सालफळ, निझामपूर, बेढोणा, हिवरा, हिवरा (तांडा), बोदड, वाढोणा, खुबगाव, पाचोड, बोथली आणि खरांगणा येथील कामे रखडलेली आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)
योजनेची कामे रखडलेली गावे
आष्टी तालुक्यातील वडाळा, सत्तारपूर, धाडी, आबादकिन्ही, तळेगाव (श्या़पं़), काकडदरा, बोरखेडी, अजितपूर. आनंदवाडी, गोदावरी, टेकोडा व चिस्तूर, देवळी तालुक्यातील गुंजखेडा, हिवरा (हाडके), निमसडा, भोजनखेडा आणि इंझाळा येथील कामे रखडली आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, वेळा, वेणी, आजनसरा, डोरला, इंझाळा व कारंजा तालुक्यातील भालेवाडी, गारपीट, जोगा व मदनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (मिर्झापूर), बोडखा, झुणका, कोरा, समुद्रपूर, निंबाळा, जिरा तसेच सेलू तालुक्यातील कोटंबा, केळझर तर वर्धा तालुक्यातील धुळवा या गावांतील कामेही रखडलेली आहेत़