राष्ट्रीयस्तर चर्चात्मक टेराकोटा शिल्प कार्यशाळा
By admin | Published: March 12, 2017 12:37 AM2017-03-12T00:37:51+5:302017-03-12T00:37:51+5:30
एमगिरीच्या ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे भारतातील कुंभारकारितेला अनुसरून विविध राज्यातील
एमगिरीतील उपक्रम : प्रात्याक्षिकातून साकारणार नवीन कलाकृती
वर्धा : एमगिरीच्या ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे भारतातील कुंभारकारितेला अनुसरून विविध राज्यातील टेराकोटा प्रमुख प्रशिक्षक व सहायकांसाठी राष्ट्रीयस्तरावर चर्चात्मक टेराकोटा शिल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेला शुक्रवारी प्रारंभ झाला असून ते २४ मार्चपर्यंत एमगिरी वर्धा येथे सुरू राहणार आहे.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी एमगिरीचे निदेशक डॉ. पी.बी. काळे, उपनिदेशक के.व्ही. राव, एमगिरीचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. काळे म्हणाले की, अनेक भारतीय पुरातन कला या लुप्त होत चालल्या आहेत. या कला वाचवायच्या असतील तर आपल्या जवळील ज्ञान हे दुसऱ्याला दिले पाहिजे. ज्ञान दिल्याने वाढते. आपण एका विशिष्ट उद्देशाने येथे जमलो आहोत. संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कलाकारांच्या ज्ञानाचा फायदा एकाच ठिकाणी एमगिरीने उपलब्ध करून दिलेला आहे. या काळात चर्चात्मक सत्रातून विविध कलात्मक विषयावर चर्चेच्या व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण गोष्टी साकारल्या जातील, याचा विश्वास असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकातून उपनिदेशक राव यांनी ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे ग्रामीण उद्योगाला चालना मिळावी या दृष्टीकोनातून विविध प्रशिक्षणे घेतली जातात. यात धातुशिल्प, काष्ठशिल्प, बांबू शिल्प प्रशिक्षण, खादी बॅग, कागदी बॅग प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. यातून ग्रामीण कारागिरांचे कौशल्य वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान करून आपला विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निवेदिका मयूरी पंडित यांनी केले तर आभार तुकाराम शेगोकार यांनी मानले. शिबिराला प्रशिक्षणार्थी हजर होते.(कार्यालय प्रतिनिधी)