राष्ट्रीय कीटकजन्य, जलजन्य व रोग नियंत्रण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:23 PM2018-03-22T22:23:05+5:302018-03-22T22:23:05+5:30
राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागरण मोहिमेत उत्कृष्ट सहभाग घेतलेल्या भजन मंडळ, युवा मंडळ, बचत गट व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागरण मोहिमेत उत्कृष्ट सहभाग घेतलेल्या भजन मंडळ, युवा मंडळ, बचत गट व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापुर व खर्डाच्यावतीने भिडी येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्या हस्ते झाले.
पावसाळ्यात होणारे आजार व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर निबंध, रांगोळी, चित्रकला, पोस्टर स्पर्धा व जनजागरण दिंडी आदी कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात उत्कृष्ट भजन मंडळी, विद्यार्थी, महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता.
डॉ डवले पुढे म्हणाले, आपले घर व परीसर हिवताप डेग्यु मुक्त आहे काय? असा प्रश्न स्वत:ला विचारल्यावर ‘बुंदो से जैसे सागर बने. बुंदोमे वैसे मच्छर पले’ आपल्या घरी व परिसरात पाणी साचू देवू नका. अश्या कोणत्याही वस्तू ठेवू नका. एखादे झाकण कामाचे नाही म्हणून घराच्या छतावर फेकून देतो. तेथेच पाणी साचते व डास तयार होतात, असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
गत वर्षी भरपूर प्रमाणात किटकजन्य व जलजन्य आजारावर मात करु शकलो. कुठलाही आजार असू द्या, जोपर्यत गावातील नागरिक सहभागी होत नाही तोपर्यंत आजारावर आळा अशक्य असल्याचेही ते म्हणाले. भजन मंडळीनी दिंडी यात्रा काढून केलेले जनजागरण कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
‘बेटी बचाव बेटी पढाव’ पथनाट्यातून जनजागृती
यावेळी ‘बेटी बचाव, पेटी पढाव’ असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. तर या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रत्नापुर येथील साईनाथ भजन मंडळ, अन्नपुर्णा भजन मंडळ, शारदा भजन मंडळ, हुसनापूर, मुगसाजी भजन मंडळ, गोपाळ कृष्ण भजन मंडळ, वाबगाव येथील दुर्गा माता भजन मंडळ, अवधुती नामानंद भजन मंडळ, रुखमाबाई महिला मंडळ, गुरुमाऊली महिला भजन मंडळ, गुरुवर्य सिताराम महिला भजन मंडळ, नामानंद वारकरी भजन मंडळाच्या सदस्याचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रविण धाकटे होते तर प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ वैद्यकीय अधिकारी डॉ. जुही वानखडे (बडोले), भिडी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. अनुज मुदंडा, डॉ.शालीन, डॉ. अनुपिया झा, डॉ. विदीत, डॉ. क्षितीज, मंंगेश थोटे यांची उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील चमूचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आशा समन्वयक पदमा खडसान, कृष्ठरोग तंत्रज्ञ बबिता तांकसांडे, सविता गोटेकर यांची उपस्थिती होती. यावेळी कुटुंब कल्याण व साथरोग कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले. संचालन आरोग्य सेविका वृंदा घोडमारे यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक संजय डगवार यांनी माणले. आयोजनाकरिता निलेश साटोणे, अशोक दरने, शैलेश चोधरी, स्वाती ताकसांडे, हुसना बानो शेख, राजश्री येवले, तुषार धात्रक यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.