निसर्गाची ४३ हजार हेक्टर सोयाबीनवर आपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:02+5:30
जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ केली पण, सरुवातीला बोगस बियाण्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कापूस विक्रीचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी त्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. पण, सततचा पाऊस आणि विविध किडीच्या प्रादुर्भावाने जवळपास ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. यापैकी बहूतांश पीक हाताबाहेर गेले असून शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या आणि पावसाने उघडीप दिली तर काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. तरीही यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ केली पण, सरुवातीला बोगस बियाण्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले. त्यानंतर सततच्या पावसामुळे सोयाबीनची झपाट्याने वाढ झाली पण, झाडाला मोजक्याच शेंगा लागल्या आहे. काही परिसरात शेगा परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. यासोबतच येलो मोझॅक, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी आणि खोडमाशीने सोयाबीनवर अटॅक केला आहे. त्यामुळे शेतातील हिरवेगार सोयाबीन जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. बºयाच भागातील सोयाबीन पिवळे पडायला लागल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. काही शेतकºयांनी सोयाबीनमध्ये जनावरे चारायला तर काहींनी पीक उपटून फेकायला सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन बाधित झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असण्याची शक्यता आहे.त्यामुळे यावर्षी निसर्गकोपाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच कंबरडे मोडले असून शासनाने त्वरीत सर्वेक्षण करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.
सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीनला युरियाचा डोज जास्त झाल्याने सोयाबीन वाढले पण, शेंगा लागण्याचे प्रमाण कमी आहे. उशिरा शेंगा लागण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. सध्या किडीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीनला फटका बसला आहे. पावसाने उघडीप दिली आणि शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यास काही प्रमाणात यातील पीक हाती लागू शकते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्या.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
शेतकऱ्यांनो... अशा करा उपाययोजना
शेतात पाणी साचू देऊ नये. साचले असेल तर नाली तयार करून पाणी शेताबाहेर काढून घ्यावे. पिवळे चिकट सापळे प्रति एकरी दहा या प्रमाणात लावावेत. पांढºया माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीडनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकाचे पाने पिवळी झालेली व पानाच्या शिरा हिरव्या असल्याचे दिसून येत असतील तर हा प्रकार लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. त्यावर उपाय म्हणून त्वरीत ५० ग्रॅम फेरस सल्फेट + २० ग्रॅम झिंक सल्फेट + २५ ग्रॅम खाण्याचा चुना १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
सोयाबीन पिकामध्ये खोड माशी व चक्रभुंगा किडीचा प्रादूर्भाव आढळल्यास इथिऑन ५०% इसी कीडनाशक १५ ते ३० मिली (प्रदूभार्वाची तीव्रता लक्षात घेऊन) किंवा क्लोरणट्रनिलिप्रोल १८.५ % एससी ३ मिली यापैकी कोणतेही एक किडनाशक प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक किडनाशकांची, बुरशीनाशकाची एकत्रितपणे फवारणी करू नये. फवारणी करतांना योग्यती सुरक्षेची काळजी घेऊनच फवारणी करावी.
कारंजा (घा.) : तालुक्यामध्ये सोयाबीनचे पीक खोडअळीने नष्ठ झाले असतानाच कपाशीही धोक्यात आली आहे. अतिपावसामुळे झाडांची वाढ खुंटली असून झाडे जळायला लागली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संक टात असताना आजी-माजी आमदार श्रेयवादात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांनी हा वाद सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. कृषी विभागानेही तात्काळ शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना अनुदान देण्याची मागणी होत आहे.
रोहणा : परिसरात मागील चार-पाच दिवसांपर्यंत हिरवे असलेले सोयाबीन आता पिवळे पडून वाळत आहे. हिरव्या झाडांना देखील अत्यल्प शेंगा असल्याचे शेतकरी चिंताग्रस्त आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशी व तूर या पिकांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. सोयाबीन हातचे जाण्याची स्थिती असून कपासीवरील बुरशीने पाती-फुल गळ झाली आहे. अपर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले. रोहणा, सायखेडा, दिघी, वडगाव, धनोडी येथील शेतकऱ्यांची शेतं पाण्याखाली आले आहे. त्यामुळे हे पीकही हातचे जाण्याची शक्यता बळाली आहे. त्यामुळे सर्वे करुन शेतकºयांना त्वरीत अनुदान देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य माया नायसे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
चिकणी (जामणी) : गेल्या वर्षी कापूस उत्पादकांची कोंडी झाल्याने यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी सततच्या पावसाने सोयाबीनची झपाट्याने वाढ झाली पण, झाडांना शेंगाच दिसत नसल्याने सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे. एक महिन्यापासून पावसाने पाठ सोडली नाही. आताही ढगाळ वातावरण कायम असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाडांची फुल गळली असून पानेही कातरायला सुरुवात झाली आहे. पढेगाव येथील मनोहर चक्रधरे, गजानन दुर्गे यांच्यासह चिकणी येथील मनोहर काकडे यांच्यासह इतर शेतकºयांची हीच स्थिती आहे. शेतकºयांनी तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
देवळी : तालुक्यात सोयाबीनला शेंगा न आल्यामुळे शेतकऱ्यावर गंभीर संकट ओढवले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या ३३५ च्या वाणाला काहीच शेंगा नसल्याची ओरड आहे. काहीना पाच-दहा शेंगा असल्यातरी त्या भरल्या नसल्याने यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम पाण्यात गेल्यागत आहे. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी शेंगा नसलेल्या सोयाबीनचे रोपटे घेवून तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे या समस्येकडे लक्ष वेधत आहे. मुरदगाव (खोसे) येथील हरिश रमणलाल ओझा या शेतकºयाने ४० एकरात ३३५ वाणाचे सोयाबीन लावले. सोयाबीनचे पीक कंबरेपर्यंत उंच वाढले परंतु या वाणाला शेंगा न आल्यामुळे त्यांनी संबंधित दुकानदार व कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. तसेच चिकणी येथील रामदास सुर्यभान सावळे यांच्या शेतात सुद्धा हीच परिस्थिती आहे.
वायगाव (नि.) : कोरोना महामारीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकºयांनी कसेबसे सावरत सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यात बहुंताश सोयाबीन उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीन चांगले बहरल्याने चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र, सततचा पाऊस आणि ढगाळी वातावरण अळींकरिता पोषक ठरल्याने त्यांनी पिकांवर आक्रमण केले. सोयाबीनवर खोडअळी आल्याने शेंगा गळती सुरु झाली. परिणामी वायगाव (निपानी), नेरी, मिरापूर, तळेगाव (टा.), सिरसगांव, भिवापूर, सेलु काटे व इतर गावातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन अपटून जनवारांना चारत असल्याचे दिसून येत आहे.