परिसरातील नदी नाल्यांना आले घाटाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:45 PM2018-04-01T23:45:43+5:302018-04-01T23:45:43+5:30
रेती घाटांवर महसूल विभागाची करडी नजर असल्याने येथून रेती चोरी करणे शक्य होत नसल्याचे दिसते. यामुळे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातून वाहत असलेल्या नदी नाल्यांकडे वळविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : रेती घाटांवर महसूल विभागाची करडी नजर असल्याने येथून रेती चोरी करणे शक्य होत नसल्याचे दिसते. यामुळे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातून वाहत असलेल्या नदी नाल्यांकडे वळविला आहे. यामुळे या नद नाल्यांना रेती घाटाचे स्वरूप आले आहे. नदी व नाल्याच्या काठावर गाळलेली रेती व साहित्य पडून असल्याचे दिसून येते. आकोली परिसरात असलेल्या नदीच्या काठावरील रेती कालव्यामार्गे लपून चोरून वाहतूक केली जात आहे. यामुळे कालव्याचे रस्ते उध्वस्त होत असून कडा खचल्याचे दिसून आले आहे.
आकोली परिसरातून वाघाडी, सूर व धाम नदी वाहते. नदीत मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. रेती घाटाचे नियम जाचक आहे. रॉयल्टी सुद्धा भरावी लागते. याउलट नदी नाल्यांतील रेतीची वाहतूक करणे तुलनेने सोईचे असते. महसूल प्रशासनातील काहींना हाताशी धरले की, कार्यभाग साधता येतो. त्याचमुळे नदी नाल्यांकडे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. त्यांचे ट्रक ट्रॅक्टर या मार्गे धावताना दिसत आहे. दिवसभर रेती चाळणीने गाळायची व रात्रीला वाहतूक करायची असा येथे दिनक्रम सध्या झाल्याचे दिसत आहे. यावर महसूल विभागाने लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.
घाटाची रेती असल्याचे सांगून नाल्यांची रेती ग्राहकांच्या मस्तकी मारली जाते. तर कधी घाटाची रेती व नाल्याची रेती एकत्र करून चढ्या दरात विकली जात असल्याची ओरड आहे. या रेती व्यवसायाची अनेक तलाठ्यांना माहिती आहे. त्यांना मोकळेपणाने काम करू दिले तर शासनाचा महसूल वाढेल. अन्यथा गौण खनिजाची लूट कधीच थांबणार नाही, असे चित्र आहे.