निसर्गकोपात अठराशे शेतकऱ्यांची होरपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:21+5:30
सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना ...
सुहास घनोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे. जूनपासून तर ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत आठही तालुक्यातील १ हजार ८१७ शेतकऱ्यांचे १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड केली. पण, सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. विद्युल्लतेच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा बळी घेतला आहे. यात देवळी तालुक्यात एक, वर्ध्यात तीन, कारंजा(घाडगे) मध्ये एक, समुद्रपूर एक तर आर्वी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
यापैकी कारंजा व आर्वी तालुक्यातील प्रत्येकी एका मृताच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई मिळाली असून सहा जणांचा परिवार अद्याप मोबदल्याचा प्रतीक्षेत आहे. तसेच आर्वी येथील एकाचा पुरात वाहत गेल्याने मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पुराचा फटका, मिळाला दुप्पट निधी
जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे शेतीच्या नुकसानीची ऑगस्टपर्यंतची माहिती असून जनावरे व घरांच्या नुकसानीची संख्या सप्टेंबरपर्यंत प्राप्त झाली आहे. घरांच्या व जनावरांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला आहे. विशेषत: ऑगस्ट महिन्यात पुराचा मोठा तडाखा बसल्याने ५०५.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने ३४ लाख ३९ हजार ७७२ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पण, महापुराचा फटका बसल्याने केंद्र व राज्य शासनाकडून नुकसानभरपाईकरिता ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती असून शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. लवकरच ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
सतरा जनावरेही दगावली
जूनपासून जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे दुधाळू तसेच शेतीकामाकरिता वापरली जाणारी १७ जनावरे दगावली आहे. यात जून महिन्यात सहा, जुलै व आॅगस्ट महिन्यामध्ये प्रत्येकी एक तर सप्टेंबर महिन्यात तब्बल ९ जणावरे दगावली आहेत.
दुधाळू जनावरांच्या मोबदला म्हणून प्रती जनावर ३० हजार रुपये तर ओढकामाकरिता वापरल्या जाणाऱ्या जनावरांचा मोबदला म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये शासनाकडून दिले जातात. मृत जनावरांचा मोबदला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.