अवकाळीने हिरावला बोर अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 07:37 PM2023-05-03T19:37:46+5:302023-05-03T19:38:19+5:30
Wardha News यंदा संबंधित संरक्षित वनात ५५ मचाणांवर रात्र जागत वन्यजीवांचे दर्शन घेण्याची इच्छा उराशी बाळगून तब्बल १०९ व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने बुकींग केली होती.
महेश सायखेडे
वर्धा : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वन्यजीवांबाबत प्रेम असलेल्या अनेक व्यक्ती मोठ्या आशेने वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभवासाठी नोंदणी करतात. यंदा संबंधित संरक्षित वनात ५५ मचानींवर रात्र जागत वन्यजीवांचे दर्शन घेण्याची इच्छा उराशी बाळगून तब्बल १०९ व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने बुकींगही केली. पण थांबून थांबून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसाने या व्यक्तींचा निसर्गानुभवाचा आनंदच हिरावला आहे.
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य नागपूर कार्यालयाच्या वतीने ५ व ६ मे रोजीला निसर्गानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा लाभ घेत निसर्गानुभवाचा आनंद लुटण्याची इच्छा असणाऱ्यांना घरबसल्या नोंदणी करता यावी यासाठी ऑनलाईन बुकींगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. संबंधित राखीव जंगल क्षेत्रातील एकूण ५५ मचानींवर रात्र जागून विविध वन्यजीवांचे दर्शन होईल या आशेने ऑनलाईन पद्धतीचा वापर करून तब्बल १०९ व्यक्तींनी बुकींगही केली. पण मागील काही दिवसांपासून कोसळणारा सततचा पाऊस व ढगाळी वातावरणाचे कारण पुढे करून बुधवारी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य नागपूर पी. बी. पंचभाई यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निसर्गानुभव कार्यक्रम रद्द झाल्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे अवकाळीने बोर अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभवच यंदा हिरावल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कुठे किती होत्या मचाणी?
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून चंद्र प्रकाशात नागरिकांनाही निसर्गानुभवाचा आनंद लुटता यावा या हेतूने सेलू तालुक्यातील न्यू बोर येथे दहा मचानी, बोर येथे १५ मचानी, उमरेड येथे १०, पवनी येथे १० तर कुही येथे १० मचानी उभारण्यात आल्या होत्या. या एकूण ५५ मचानींवर अनुक्रमे २०, ३०, २०, २०, २० व्यक्तींना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, हे विशेष.