सेवाग्रामला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:00 AM2019-08-17T00:00:16+5:302019-08-17T00:00:47+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धेत येत असून ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहे. शिवाय ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धेत येत असून ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहे. शिवाय ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांचा तगडा या परिसरात लावण्यात आला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ५६० पोलीस अधिकारी व कर्मचारी खडा पहारा देणार आहेत. त्याची रंगीत तालीम शुक्रवारी पार पडली. बंदोबस्तामुळे सध्या सेवाग्राम आश्रम व परिसराला पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन १०.४५ वाजता सेवाग्राम येथील तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर होणार आहे. त्यानंतर ते बापूकुटी येथे जाणार आहेत. सुमारे २५ मिनीट ते बापूकुटीत राहणार असून ते तेथील कार्यप्रणालीची माहिती जाणून घेणार आहेत. शिवाय वृक्षारोपण करणार आहेत. त्यानंतर ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायंसच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. दुपारी १२.२० वाजता ते हेलिपॅडवर येत तेथून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. असे असले तरी त्यांच्या सुरक्षेसाठी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ उपविभागीय पोलीस अधीकारी, १८ पोलीस निरीक्षक तर सुमारे ४५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. शनिवारी हे पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवाग्राम परिसरात खडा पहाराच देणार आहेत.
३५ कर्मचारी नियंत्रित करणार वाहतूक व्यवस्था
शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सेवाग्राम येथे येत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला आहे. या परिसरात कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे एकूण ३५ अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे.
अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सेवाग्राम परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत जमेस्तोवर सेवाग्राम मार्गे वर्धा तर सेवाग्राम होत पुढील प्रवास करणाऱ्यांनी येथून ये-जा करण्याचे टाळावे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांनी दुसऱ्या माार्गाचा वापर करावा.
- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.
तयार केले तात्पुरते हेलिपॅड
राष्ट्रपतीचे हेलिकॉप्टर सेवाग्राम परिसरात उतरण्यासाठी सेवाग्राम परिसरातील हमदापूर मार्गावरील मोकळ्या जागेवर तात्पूरते हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. याच हेलिपॅड शनिवारी राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरणार आहे. विशेष म्हणजे या परिसरात सर्वसामान्यांना प्रवेश बंदी राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ते करण्यात आले आहे.
जड वाहतूक केली वळती
अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुजईकडून येणाऱ्या जड वाहनांना शनिवार १६ रोजी चितोडा बरबर्डी मार्गे पुढील प्रवासाकरिता जावे लागणार आहे. असे असले तरी इतर वाहनांना या वाहनांना ये-जा करता येणार असले तरी राष्ट्रपतींचा ताफा जाईस्तोवर वाहतूक थांबविण्यात येणार आहे.