सेवाग्राम स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप

By Admin | Published: April 7, 2017 01:57 AM2017-04-07T01:57:55+5:302017-04-07T01:57:55+5:30

वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन झाले.

The nature of the police camp in Sevagram station | सेवाग्राम स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप

सेवाग्राम स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप

googlenewsNext

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन : अनुचित घटना घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त
वर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन झाले. आंदोलनकर्ते नेमके कुठे रेल्वे रोको करतील, याबाबत पोलीस अनभिज्ञ असल्याने सेवाग्राम रेल्वे स्थानकापासून तर आंंदोलनकर्ते जमा झालेल्या ठिकाणापर्यंत पोलीसच पोलीस दिसत होते. मात्र मोर्चा स्थळापासूनच शांततेत निघाला आणि सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहचला. यानंतर आंदोलनही शांततेत पार पडताच पोलिसांना खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त अभूतपूर्व असाच होता.
पोलिसांच्या या चोख बंदोबस्तामुळे आंदोलन होणार अथवा नाही, अशी स्थिती असताना आंदोलकांनी त्यांचा रेल्वे स्थानकावर येण्याचा मार्ग बदलविल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारी रात्रीपासूनच आंदोलनेकर्ते वर्धेत दाखल होणे सुरू होते. यामुळे नेमके किती आंदोलक येतील याचा अंदाज पोलिसांना आला, यानुसार पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. सेवाग्राम रेल्वे स्थानकाला सकाळपासूनच पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. या परिसरात ठिकठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी म्हणून पोलिसांच्या गाड्या सज्ज करण्यात आल्या होत्या. पोलीस कर्मचारी वेळोवेळी वरिष्ठांना आंदोलकांबाबत अपडेट देत होते. दुपारची १२ वाजताची वेळ. सूर्य डोक्यावर असून आग ओकत होता. उन्हातान्हाची तमा न बाळगता १२.३० वाजता मोर्चाच्या नियोजनस्थळापासून मोर्चाला प्रारंभ झाला. आंदोलकांची संख्या पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली. मोर्चा निघताच कोणतीहीची अनुचित घटना घडून नयू म्हणून पोलीस पथक मोर्चाकडे वळली. सुमारे १५ मिनिटात मोर्चा सेवाग्राम रेल्वे स्थानकावर धडकला. पोलिसांची संख्या बघता रेल्वे रोको होणार वा नाही, याची उत्सुकता ताणलेली होती. मात्र आंदोलनकर्ते आणि पोलिसांनी संयम बाळगल्याने आणि आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार असल्याची बाब पुढे आल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोखली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे इंजिनावर चढून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे फलक झळकावले. मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान, रेल्वे स्थानकावर चोहोबाजुने आंदोलनकर्ते आणि खाकी वर्दीतील पोलिसच दिसत होते. खबरदारी म्हणून राज्य पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त बंदोबस्त ठेवला होता.
रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरीगेट्स लावण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर प्रवेश घेण्याकरिता असलेल्या दारावर चोख बंदोबस्त होता. परिस्थिती हाताळण्याकरिता राज्य पोलीस दलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल स्वत: आपल्या कर्मचाऱ्यांसह परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी जातीने हजर होते. रेल्वे रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी तामीळनाडू एक्सप्रेस रोखली असता पोलिसांनी त्यांना रुळाच्या बाजुला केले. काही काळ आंदोलकांनी रूळावर रेंगाळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस दलासमोर त्यांनी नमते घेतले.
सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी रेल्वे रूळ सोडत ज्या मार्गे रेल्वे स्थानक गाठले त्याच मार्गे परतही निघाले घेतला. अखेर कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन सकाळपासून तैनात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)

अश्रू धुराचे नळकांडे
आंदोलनादरम्यान कुठलिही अनुचित घटना घडल्यास आंदोलकांना पांगविण्याकरिता पोलिसांच्यावतीने अश्रू धुराच्या नळकांड्याचीही व्यवस्था करण्यात आली; मात्र आंदोनही सामज्यस्याने झाल्याने त्याची पडली नाही.
रायफलधारी पोलीसही तैनात
या बंदोबस्तत राज्य व रेल्वे पोलीस दलाचे रायफलधारी पोलीसही तैनात होते. आंदोलन शांततेत झाल्याने त्यांचा उपयोग झाला नाही.

जिल्ह्यातील तिसरे मोठे
रेल रोको आंदोलन
शेतकरी संघटनेने वर्धेत यापूर्वी दोनदा रेल्वे राको आंदोलन केले. यापूर्वी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्चात सन १९८२ आणि त्यानंतर १९९४-९५ मध्ये मुख्य रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको केला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.

Web Title: The nature of the police camp in Sevagram station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.