स्टेशन मार्गाला ट्रॅव्हल्स स्टॅन्डचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:46 PM2017-09-06T23:46:56+5:302017-09-06T23:47:12+5:30
शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या वर्धा रेल्वे स्टेशन रोडवर काही ट्रॅव्हल्स चालक वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही मनमर्जीने वाहने उभी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या वर्धा रेल्वे स्टेशन रोडवर काही ट्रॅव्हल्स चालक वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही मनमर्जीने वाहने उभी करीत आहेत. त्यांच्याकडून येथूनच वाहनात प्रवासीही भरले जात असून रस्त्याच्या मधोमधच बºयाचदा वाहने उभी केल्या जात असल्याने वाहतूक खोळंबते. याकडे वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष होत असून हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
स्टेशन रोडवर छोट्या-मोठ्यासह जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात जिल्ह्याबाहेरून येणाºया नागरिकांना सुविधा व्हावी या हेतूने रात्रीला नवजीवन एक्सप्रेसच्या वेळेवर नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी दोन बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस रात्रीच्या सुमारास वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून पुढील प्रवासाकरिता रवाना होतात. तसेच दिवसभर स्टेशन मार्गावर छोट्या-मोठ्या वाहनांची बºयापैकी ये-जा सुरू असते. याच मार्गावर जिल्ह्याला पुरवठा करणारा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा मुख्य भाजीबाजार आहे. त्यामुळे या मार्गावर भाजी खरेदी करण्यासाठी येणाºया नागरिकांचीही नेहमी गर्दी राहते. पण, याच मोठ्या वर्दळीच्या मार्गावर सध्या काही ट्रॅव्हल्स चालक आपल्या आर्थिक फायद्यासाठी थेट रस्त्यावर वाहने उभी करून वाहनात प्रवाशांचा भरणा करीत आहेत.
चालक आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या मधोमध उभी करीत असल्याने या मार्गावरील वाहतूक नेहमीच खोळंबते. हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेत सदर प्रकाराकडे वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत विशेष मोहीम हाती घेत कारवाई, करावी अशी मागणी नागरिकांची आहे.
मोठ्या अपघाताची शक्यता
वर्धा रेल्वे स्टेशन मार्गावर जड वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही वाहने उभी केली जात आहेत. ज्या भागात ही वाहने उभी केली जातात तेथून हाकेच्या अंतरावर दररोज वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. परंतु, त्याच्या समक्ष ट्रॅव्हल्स चालक रस्त्यावरच वाहने उभी करून त्यात प्रवाशांचा भरणार करतात. या प्रकारामुळे वाहतूक खोळंबत असून सदर प्रकार मोठ्या अपघाताला कारणीभुत ठरणारा ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता योग्य कार्यवाहीची गरज आहे.
डॉ. आंबेडकर बगीचा परिसरात ट्रॅव्हल्सला दोन मिनिटांच्यावर थांबता येत नाही. तेथील ट्रॅव्हल्सचा कायमस्वरूपी थांबा वरिष्ठ अधिकाºयांच्या सुचनेवरून बंद करण्यात आला आहे. तशा सूचनाही ट्रॅव्हल्स चालक व मालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच वर्धा रेल्वे स्टेशन मार्गावर कुणालाही ट्रॅव्हल्स उभी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
- दत्तात्रय गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा.
कृउबा समितीच्या जागेवर अतिक्रमण
ट्रॅव्हल्स चालकांना वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेतील वरिष्ठ अधिकारी येत असल्याचे माहिती पडताच ते आपली वाहने थेट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा असलेल्या भाजी बाजारात नेऊन उभी करता. ट्रॅव्हल्स या भागात आणली कशी अशी विचारा केली असता वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत उभे आहे, असे सांगून ते वाहतूक पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. परिणामी, वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जुना थांबा डॉ. आंबेडकर बगीच्या जवळ
स्थानिक स्टेशन मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भंडारी यांच्या कार्यकाळात वरिष्ठ अधिकाºयांच्या मध्यस्तीअंती वर्धा शहरातील डॉ. आंबेडकर बगीचा समोर ट्रॅव्हल्सला थांबा देण्यात आला होता. परंतु, सध्या प्रवासी मिळविण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमुळे नियमांना फाटा देत थेट वर्धा रेल्वे स्थानक मार्गावरूनच ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी भरल्या जात आहेत.
पेट्रोलपंपावर असतो मुक्काम
होणाºया कारवाईला पुढे जावे लागू नये म्हणून काही ट्रॅव्हल्स चालकांनी नवीन युक्ती शोधून काढली आहे. सध्या काही ट्रॅव्हल्स चालक व मालक शास्त्री चौक भागातील पेट्रोलपंपावर आपली वाहने उभी करीत आहेत. या परिसरात रात्र-रात्र काही ट्रॅव्हल्स मुक्कामी असतात.