नळाच्या पाण्यात नारू
By admin | Published: March 31, 2016 02:44 AM2016-03-31T02:44:33+5:302016-03-31T02:44:33+5:30
गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही.
आरोग्य धोक्यात : सेलसुरा पाणी पुरवठा योजनेतील प्रकार
वायगाव (नि.) : गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली; पण कारवाई झाली नाही. आता नळाच्या पाण्यात नारूसदृश कृमी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सेलसुरा या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेच्या विहीर व टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. ग्रा.पं. चा शिपाई दिरंगाई करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय पाईप-लाईनही अनेक ठिकाणी फुटलेली आहे. यामुळे नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण कुणीही याकडे लक्ष दिले नाही. यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.
एक वर्षापासून मुख्य पाईप लाईन फुटलेली असताना दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. लेखी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने सार्वजनिक आरोग्याचे कुणालाही सोयरसुतक नाही काय, असा प्रश्न सेलसुरा येथील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.(वार्ताहर)
फुटलेल्या पाईपकडेही दुर्लक्ष
सेलसुरा येथील ग्रामस्थांना गत कित्येक दिवसांपासून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. आता नळातून नारूसदृश्य कृमी येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गत एक वर्षापासून गावातील पाईपलाईन लिकेज आहे. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या; पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
ग्रामपंचायतचा शिपाईदेखील पाणी पुरवठ्याची विहीर आणि टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकत नाही. गत सहा महिन्यांपासून पाणी शुद्ध करण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.