आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट; ३६८ एकरात होणार औद्योगिक वसाहत
By आनंद इंगोले | Published: October 15, 2023 07:33 PM2023-10-15T19:33:55+5:302023-10-15T19:36:01+5:30
अखेर आर्वीपूत्राच्या प्रयत्नाने घटस्थापनेच्या दिवशी आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यामुळे राज्य शासनाची ही आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट ठरली.
वर्धा : आर्वी ही ब्रिटीशांच्या काळापासून मोठी बाजारपेठ राहिली आहे. येथील कापसाला विदेशातही मोठी मागणी होती. परंतु कालौघात ही बाजारपेठेची ओळख पुसल्या गेली. या ठिकाणी औद्योगिकरणाला फारशी चालना मिळाली नसल्याने बेरोजगारीचीही समस्या भेडसावत आहे. यातूनच आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी रेटण्यात आली. अखेर आर्वीपूत्राच्या प्रयत्नाने घटस्थापनेच्या दिवशी आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यामुळे राज्य शासनाची ही आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट ठरली.
आर्वीतील उद्योगांना चालना मिळून बेरोजगांच्या हाताला काम मिळावे आणि ब्रिटीशकालीन आर्वीची ओळख पुन्हा निर्माण व्हावी म्हणून आर्वी कॉटन अॅण्ड जिनर्स असोसिएशनने आर्वीपूत्र तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यसन अधिकारी सुमित वानखेडे यांच्याकडे एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी लावून धरली. सुमित वानखेडे यांनी याकरिता यशस्वीरित्या पाठपुरावा केल्याने अवघ्या १२ महिन्यात आर्वी येथील औद्योगिक वसाहतीला मान्यता मिळाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये अडेगाव, लाडणापूर व लहादेवी या क्षेत्रातील ६७.८९ हेक्टर औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आर्वीकरांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची मिळाली मोलाची साथ
आर्वीमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करण्याकरिता उद्योजकांनी उपमुख्यमंत्र्यांचे कार्यसन अधिकारी तथा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश एमआयडीसीच्या सचिवांना दिले. राज्याच्या उद्योग विभागाने एक रेकॉर्ड तयार करुन त्याला मान्यताही दिली. या महत्त्वाचा कामाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव हर्षदीप कांबळे व एमआयडीचे मुख्याधिकारी विपीन शर्मा यांचे सहकार्य लाभल्याने सुमित वानेखेडे यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभारही मानले.
या गावातील जमिनीवर होणार एमआयडीसी
आर्वीतील औद्योगिक वसाहतीकरिता तालुक्यातील अडेगाव परिसरातील ९.९१ हेक्टर, लाडणापूर परिसरातील ३६.५९ हेक्टर आणि लहादेवी परिसरातील ६७.८९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ही जमिन आर्वी ते वर्धा या राज्यमहामार्गालगत असल्याने यामुळे आता आर्वी ते वर्धा या महामार्गाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
डिसेंबर महिन्यात कॉटन अॅण्ड ऑईल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आर्वीत एमआयडीसी व्हावी, याकरिता निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन अवघ्या १२ महिन्यात नव्याने एमआयडीसी स्थापित करण्याचा निर्णय घेऊन मान्यता मिळाली. ही आर्वीकरांसाठी नवरात्रोत्सवाची भेट ठरली आहे. यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याने एक आर्वीकर म्हणून मलाही मोठे समाधान मिळाले आहे.
- सुमित वानखेडे, लोकसभा प्रमुख