विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास नाही, पवनारमध्ये शेतक-यानं कापसावर धनंजय मुंडेंनाच फिरवायला लावला ट्रॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 01:32 PM2017-12-07T13:32:18+5:302017-12-07T15:21:06+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला.
वर्धा - विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला.
हल्लाबोल पदयात्रेच्या सातव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवनार येथे पोहोचले. पवनार येथील शेतकरी श्रीकांत तोटे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या कापूस शेतीचे पाहणी करण्याची विनंती केली. बोंड आळीमुळे हाती आलेले पिक वाया गेले. पण शासनाने तोटे यांच्यामागे वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला असल्यामुळे दुहेरी संकट उभे राहिले होते.
जेवढा कापूस झालेला आहे तो घेऊन जा आणि त्यातून लाईट बिल वजा करा, असे तोटे यांचे म्हणणे होते. जर असे करता येणार नसेल तर सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतः या शेतावर नांगर चालवावा, असे आर्जव तोटे यांनी केले. आम्ही नांगर चालवण्यास तयार नव्हतो. मात्र तुम्ही नांगर फिरवला नाही तरी मी हा कापूस आडवा करणार असल्याचे सांगत तोटे आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. उभ्या कापसात नांगर चालण्याचे काम दुःखद अंतकरणाने करावे लागले, अशी प्रतिक्रिया यावेळी मुंडे यांनी दिली. चित्र बघून शेतकऱ्याचे काळीज करपत आहे. आतातरी देवेंद्र फसवणीस सरकारने डोळे उघडावेत आणि कापसाला हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी. जो कापूस निघाला आहे त्याला ५०० रुपये बोनस द्यावा. अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली.